scorecardresearch

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रयोगशाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अपंग विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विविध पदविका अभ्यासक्रमही राबवण्याचे नियोजन आहे. दिव्यांग अभ्यास आणि सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र आणि विस्तार विभाग, यूथ फॉर जॉब फाउंडेशन यांच्यातर्फे  विद्यापीठातील डिजिटल प्रयोगशाळा आणि सहायक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठीच्या नवीन सुविधांचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, शिक्षणशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा. संजीव सोनवणे, विभागाच्या प्रमुख प्रा. मेघा उपलाने, यूथ फॉर जॉब फाउंडेशनचे वरिष्ठ प्रबंधक रमेश दुरईकन्नन, समीर नायर, कॅपजेमिनी सीएसआर इंडियाच्या ऑपरेशन प्रमुख धनश्री पागे आदी या वेळी उपस्थित होते. डिजिटल प्रयोगशाळेसाठी २५ आधुनिक संगणक, एक एलसीडी प्रोजेक्टर, प्रिंटर, लॅपटॉप या साधनांसह दोन संगणक प्रशिक्षक, एक सॉफ्ट स्किल प्रशिक्षक आणि एक प्रशासकीय कर्मचारी तीन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी आवश्यक असलेले माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांसाठी विविध पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Digital laboratory students disabilities savitribai phule pune university employment required training ysh

ताज्या बातम्या