पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेमध्ये हवामान नोंदी आणि अंदाजांसाठी ‘डिजिटल सरफेस मेटिरोलॉजिकल ऑब्झर्व्हेशन सिस्टीम’ ही नवी स्वदेशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे दर मिनिटाच्या हवामान नोंदी घेता येणार असून, हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेगाने देणे शक्य होणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत नव्या प्रणालीचा देशभरात वापर केला जाणार आहे.
जागतिक हवामान दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नव्या प्रणालीचे उद्घाटन भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पुणे वेधशाळेतील हवामान संशोधन आणि सेवा विभागाने नवी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे डिजिटल सेन्सर आणि वायफाय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवेचे तापमान, आर्द्रता, वायुदाब, वाऱ्याचा वेग आणि दिशा, पर्जन्यमान यांची माहिती थेट, तत्क्षणी उपलब्ध होते. जिओ टॅगिंगमुळे स्थानिक पातळीवरील हवामान बदल अधिक अचूकपणे नोंदवता येणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘आतापर्यंत वेधशाळांमध्ये दर तीन तासांनी याप्रमाणे दिवसभरात आठ वेळा हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यात तापमान, वाऱ्याची दिशा अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. या नोंदींचा वापर हवामान अंदाजासाठी केला जातो. अशा पद्धतीने देशभरातील ५०० वेधशाळांमध्ये काम चालते. त्याशिवाय स्वयंचलित हवामान केंद्रांकडून (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) दर १५ मिनिटांनी हवामान नोंदी उपलब्ध होतात.
मात्र, ही स्वयंचलित केंद्रे विकत घ्यावी लागतात, ती खर्चिक आहेत. त्याचा देखभाल खर्चही मोठा आहे.’ ‘आता विकसित केलेल्या नव्या डिजिटल प्रणालीमुळे हवामान नोंदी अधिक सुलभ, वेगवान आणि अचूक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. याचा खर्च तीन ते चार पटींनी कमी आहे. दर मिनिटाला हवामान नोंदी घेतल्या जाणार आहेत. या नोंदींचा वापर हवामान अंदाजासह संशोधनासाठीही करता येणार आहे. डिजिटल प्रणाली विकसित करून प्रमाणीकरण, चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घेतल्यानंतर आता त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू केला जाणार आहे. आता पुढील दोन ते तीन वर्षांत या प्रणालीचा देशभरात विस्तार केला जाणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
एकस्व अधिकार मिळवण्याची प्रक्रिया सुरू
प्रणालीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हींची निर्मिती सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली. आता या तंत्रज्ञानासाठी एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पाऱ्यावर आधारित उपकरणांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न
गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ देशभरात हवामान अंदाजासाठी पाऱ्यावर आधारित उपकरणांचा वापर केला जात आहे. मात्र, पाऱ्यावर आधारित पारंपरिक उपकरणांचा वापर कमी करण्याबाबतच्या जागतिक करारात भारताचा सहभाग असल्याने हवामान अंदाज प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी नवी प्रणाली महत्त्वाची आहे, असे
एस. डी. सानप यांनी सांगितले.
