पुणे : कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळून लावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे भागीदार असलेल्या ‘अमेडिया एंटरप्राइझेस’ कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात शीतल तेजवानीसह, दिग्विजय पाटील, तत्कालीन सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज पौड न्यायालयाने नुकताच फेटाळला. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी पाटील याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. ‘अर्जदार आरोपी तपास अधिकाऱ्यांसमोर तीन वेळा हजर राहिले. त्यांनी तपासात सहकार्य केले आहे. पाटील यांनी फिर्यादीची फसवणूक केलेली नाही.

कोणतेही बनावट दस्तऐवज तयार केलेले नाहीत. अर्जदाराची पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यक नाही’, असा युक्तिवाद पाटील यांच्या वकिलांनी केली. ‘या गुन्ह्यात राज्य सरकारची मोठी फसवणूक झाली आहे. आरोपींच्या बँक खात्यांची पडताळणी आणि साक्षीदारांची तपासणी सुरू आहे’, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने पाटीलचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला.

न्यायालयाचे आदेश काय ?

‘गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकरणातील तथ्ये पाहता, अर्जदार आरोपी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्याबाबत अयशस्वी ठरला आहे. या टप्प्यावर आरोपी दिलासा मिळण्यास पात्र नाही’, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी स्पष्ट करुन दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.