पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीसमोर पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील दावा सांगितला आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने मावळवरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे.

मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवसेनेचे मावळवर वर्चस्व राहिले. शिवसेनेतील फुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असले, तरी मावळच्या जागेवर भाजप, अजित पवार गटाकडून सातत्याने दावा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात पक्षाची चांगली पकड असल्याचे सांगत राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे.

हेही वाचा – पुणे: अमित ठाकरे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत…

मावळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे असा हट्ट धरला आहे. तर, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी मिळावी, ते निवडून येतील असे सांगत मावळवर दावा केला. त्यांच्या मागणीला शहर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बळ दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा असा आग्रह आहे. त्याची आम्ही नोंद घेतली आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत मी कार्यकर्त्यांची भावना मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक जवळ आली असतानाही राष्ट्रवादीने मावळवरील दावा सोडल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या आग्रही भूमिकेमुळे मावळवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्षाने लढ म्हणून सांगितले. तर माझ्यापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे सांगत भाजपच्या बाळा भेगडेंनी तयारी दर्शविली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत आपली उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगत प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसते.

मावळसाठी राष्ट्रवादी आग्रही का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मागीलवेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन लाख १६ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठीच राष्ट्रवादी मावळसाठी आग्रह धरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा – पिंपरी : लोकसभा निवडणुकीची तयारी; पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी

मावळमध्ये शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी, भाजपची ताकद

मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी, मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल, चिंचवडला भाजपचे आमदार असून उरणचे अपक्ष आमदार भाजपशी संलग्न आहेत. शिवसेनेचा केवळ कर्जतमध्ये आमदार आहे. शिवसेनेपेक्षा भाजप, राष्ट्रवादीची मावळात ताकद जास्त आहे. त्यामुळेच दोघांकडून मावळच्या जागेवर दावा केला जात आहे.