जुन्नर : डिंभे धरणाच्या कालव्यात पोहताना बुडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. १६ तासांच्या शोधमोहिमेनंतर मुलाचा मृतदेह सापडला.

प्रज्वल बाळासाहेब चासकर (वय १५, रा. महाळुंगे पडवळ, आंबेगाव) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी प्रज्वल हा चार मित्रांबरोबर डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. त्याने कालव्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. तब्बल १६ तासांच्या प्रयत्नांनंतर, रविवारी सकाळी घटनास्थळापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या भेकेमळा टाकेवाडी येथे त्याचा मृतदेह आढळून आला.
प्रज्वल हा चासकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. महाळुंगे पडवळ येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, धरणे, कालवे आणि नद्यांवर पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा अंदाज न घेता पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.