नवीन वर्ष सुरू झाल्याची नांदी नव्या दिनदर्शिकेने होते. जानेवारी ते डिसेंबर हे दिनदर्शिकेचे वर्ष असते. चैत्र ते फाल्गुन असे मराठी वर्ष तर जून ते एप्रिल असे शैक्षणिक वर्ष असते. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. नवे शैक्षणिक वर्ष कसे असेल आणि या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना नेमके किती दिवस शिकण्यासाठी मिळणार आहेत याचा अभ्यास दीनानाथ गोरे गेली अनेक वर्षे करीत आहेत. या अभ्यासाच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांना अचूक माहिती देत ते नेमकेपणाने मार्गदर्शन करतात. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांमध्ये नेमके काय दडले आहे, या संदर्भात दीनानाथ गोरे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

  • नव्या शैक्षणिक वर्षांचे वैशिष्टय़ काय?

यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. इयत्ता सहावीची पाठय़पुस्तके या वर्षीपासून बदलली आहेत. तर, मार्च २०१७ मध्ये दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त असणार आहे. याचाच अर्थ मार्चमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिसंख्येचा विक्रम नोंदविला जाईल अशी स्थिती आहे.

  • शाळांमध्ये सुट्टय़ा किती आणि शिकविण्याचे दिवस किती?

यंदा १४ ते १८ ऑगस्टपर्यंतच्या पाच दिवसांत केवळ एकच दिवस शाळा भरतील. १४ तारखेला रविवार आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन होणार आहे. १७ ऑगस्टला पारसी नववर्षदिनाची तर १८ ऑगस्ट रोजी शाळांना रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे १६ ऑगस्ट या एकाच दिवशी मुलांना शाळेमध्ये जावे लागेल.

  • पहिले सत्र महत्त्वाचे की दुसरे सत्र?

सहामाही परीक्षेनंतर दुसऱ्या सत्रात नगरपालिका-महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. शाळांचे स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा आणि दहावीची शालान्त प्रमाणपत्र परीक्षा यामुळे ११ नोव्हेंबर २०१६ ते ११ मार्च २०१७ या चार महिन्यांतील तीन महिने तरी शिकवायला मिळतील की नाहीत शंका आहे.

  • शिक्षकांनी अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

आपल्या वार्षिक नियोजनामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. इयत्ता नववीमध्ये भूमितीची पहिली चार प्रकरणे पहिल्या सत्रात शिकविण्यापेक्षा दुसऱ्या सत्रात शिकवावीत. विषयाचे ज्ञान पक्के होण्यासाठी आणि विषयाची गोडी सर्वसाधारण विद्यार्थ्यांना लागेल. बऱ्याच शाळांमध्ये नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यातील २० ते २५ टक्के विद्यार्थी हे गणितात ग्रेस (सवलतीचे) गुणांनी किंवा गणितात ३५ टक्के गुण मिळवून पास झाले असतात हे लक्षात घेऊनच शिकवावे लागते. बीजगणित आणि भूमिती या विषयांच्या शिकविण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

  • विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा?

सर्वच विद्यार्थ्यांनी १७ जून ते १३ ऑगस्ट या कालावधीत सर्वच विषयांचा रोजच्या रोज नियमित अभ्यास करणे हिताचे आहे. या दोन महिन्यांत केवळ दोनच सुट्टय़ा आहेत. पहिल्या सत्रातील निम्म्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम १३ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी, पहिल्या चाचणीचा निकाल लागल्यावर कमी गुण मिळालेल्या विषयाकडे जास्त लक्ष द्यावे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाढे पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • यंदाच्या शिक्षक दिनाचे वेगळेपण काय आहे?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ५ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, ४ सप्टेंबरला रविवार आला आहे. त्यामुळे शिक्षक दिन साजरा केव्हा करायचा हा प्रश्न सरकारला आणि शाळा प्रशासनाला पडणार आहे.