पुणे : सर्व शासकीय पदांची भरती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोटय़ातील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदे महापरीक्षा संकेतस्थळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महापरीक्षा संकेतस्थळामार्फत झालेल्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने  आघाडी सरकारने महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासगी कंपन्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून ओएमआर पद्धतीने परीक्षा घेऊन पदभरती करण्याचा निर्णय २०२१ मध्ये घेण्यात आला. निवडलेल्या कंपन्यांमार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने ही पद्धत स्थगित करण्यात आली. आता जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पदभरती प्रक्रिया राबवण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला.