पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात संततधार पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला ४७०८ क्युसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा १५.४१ अब्ज घनफूट (टीएमसी) ५२.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १०५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ८४ मि.मी, पानशेत धरण परिसरात ८० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात नऊ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १५.४१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी रात्री चारही धरणांत १४.६८ टीएमसी पाणीसाठा होता. गुरुवारी रात्रीच्या तुलनेत शुक्रवारी सकाळी तब्बल ०.७३ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यात एकाच आठवड्यात २५० मिलिमीटर पाऊस

दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी खडकवासला धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाल्याने या धरणातून मुठा नदीत ४७०८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   १.४२      ३८.४४
वरसगाव               ६.४०      ४९.९३
पानशेत                 ५.६१      ५२.७१
खडकवासला        १.९७      १००.००
एकूण                    १५.४१    ५२.८७