scorecardresearch

३५ प्राचीन पटखेळांचा शोध

पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर ‘मंकला’ नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले आहेत. 

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावातील खडकांवर ‘मंकला’ नावाच्या प्राचीन खेळाचे ३५ पट आणि त्याचे उपप्रकार उजेडात आले आहेत. नाशिकचे अभ्यासक सोज्वल साळी यांना हे खडकांवरील पटखेळ सापडले आहेत. प्राचीन काळात खडकांवर मनोरंजनासाठी पटखेळ कोरले गेले आहेत. आतापर्यंत पाताळेश्वर, भाजे, सिंहगड, राजगड, शिवनेरी, जुन्नर येथे काही पटखेळ सापडले आहेत. त्यानंतर वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यास करत असलेल्या सोज्वल साळी यांना मारुंजी येथील टेकडीवर ४१ पटखेळांचा शोध लागला होता. आता कापूरहोळ गावातून पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठीच्या मार्गावरील खडकांवर ‘मंकला’ या खेळाचे ३५ पट आणि त्यात वेगवेगळय़ा उपप्रकारांच्या पटांचा शोध लागला आहे. तसेच या ठिकाणच्या खडकांवर पटखेळांसह अन्य आकृत्या, चिन्हे असल्याचे दिसून येत आहे. या कामी साळी यांना अमीत नेवासे, चंद्रशेखर पिलाने यांचे सहकार्य मिळाले. 

   कापूरहोळ येथे सापडलेल्या पटखेळांविषयी साळी म्हणाले, की कापूरहोळ येथे सापडलेल्या सर्व खेळांचे दस्तावेजीकरण करण्यात आले. त्यात ‘मंकला’ या मुख्य खेळाचे उपप्रकार असल्याचे दिसून आले. मंकलाचा एक उपप्रकार केनियामध्ये ‘अजुआ’ या नावाने खेळला जात होता. तर, ‘अळीगुळीमाने’ हा खेळ आजही भारतातील कन्नड भागात खेळला जातो. कापूरहोळ येथील खडकांवर वेगवेगळी चिन्हे, आकृत्याही आहेत. त्यामुळे त्यांचाही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे. खडकांवर खड्डे असलेल्या मंकला या खेळाचे विविध प्रकार जगभरातील विविध देशांमध्ये खेळले जात असल्याचे पुरावे मिळतात. त्याबाबत आतापर्यंत संशोधनेही झाली आहेत.

 कार्ले, भाजे, बेडसे, मारुंजीनंतर आता कापूरहोळ येथेही पटखेळ आढळल्याने हा प्राचीन काळातील व्यापारी मार्ग होता का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. या बाबत अधिक सखोल संशोधन आणि या खेळांचे जतन करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. मात्र या शोध मोहिमेमध्ये इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र अभ्यासकांचा सहभाग अधिक उपयुक्त ठरेल, असेही साळी यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discovery ancient games pune satara highway ancient game ancient times entertainment ysh

ताज्या बातम्या