पुणे : अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने एका महाकाय रेडिओ दीर्घिकेचा शोध राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाने लावला आहे. विशेष म्हणजे, सुमारे दहा कोटी वर्षांच्या शांततेनंतर या दीर्घिकेच्या केंद्रातील महाकाय कृष्णविवर पुन्हा सक्रिय झाल्याचे दुर्मीळ पुरावे मिळाले असून, नवी दीर्घिका सुमारे ३० लाख प्रकाशवर्षे क्षेत्रात विस्तारलेली, तसेच आपल्या मंदाकिनी आकाशगंगेपेक्षा ५० पट विस्तीर्ण आहे.
राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) याबाबतची माहिती दिली. ‘एनसीआरए’तील डॉ. सब्यसाची पाल, शोभा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात मनिपाल सेंटर फॉर नॅचरल सायन्सेसचे सुरजित पॉल, पोलंडमधील जगिलोनियन युनिव्हर्सिटीचे डॉ. मारेक जाम्रोझी यांचाही सहभाग आहे. या संशोधनाचा शोधनिबंध ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. संशोधनासाठी जीएमआरटीच्या २५०-५०० मेगाहर्ट्झ या वारंवारितेचा वापर करण्यात आला. या लहरींच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी दीर्घिकेतील विखुरलेल्या रेडिओ उत्सर्जनाचा वेध घेतला. त्यामुळे दीर्घिकेची अवाढव्य शेपटी आणि अंतर्गत जेट्सची संरचना स्पष्टपणे आढळून आली.
J1007 3540 असे नाव असलेल्या दीर्घिकेच्या विविध भागांमधीत ‘स्पेक्ट्रल इंडेक्स’ वितरणाचा अभ्यास करून रेडिओ उत्सर्जनाचे वय आणि त्याच्या स्वरूपाचे विश्लेषण केले. या विश्लेषणातून दीर्घिकेत ‘डबल-डबल’ रचना दिसून आली. जुन्या आणि क्षीण ऊर्जा लहरींच्या आत नवीन, तेजस्वी जेट्सची जोडी तयार झाल्याचेही स्पष्ट झाले. दीर्घिकेच्या केंद्रातील कृष्णविवर पुनर्जीवित झाल्याचे हे ठोस वैज्ञानिक पुरावे असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
दीर्घिका एका दीर्घिकासमूहाच्या मध्यभागी स्थित असून, तिथे असलेल्या अतिउष्ण वायूचा प्रचंड वातावरणीय दाब या आकाशगंगेच्या उत्सर्जनावर खोलवर परिणाम करत आहे. हा कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्मा जेट्सना बाजूला ढकलून त्यांना वक्राकार स्वरूप देत आहे. आकाशगंगा समूहातून प्रवास करत असताना या दाबामुळे त्यातील द्रव्य मागे खेचले जाऊन तिथे लाखो वर्षे जुन्या अवशेषांचा एक मार्ग तयार झाला आहे. त्याला ‘गॅलेक्टिक वेक’ म्हटले जाते. दीर्घिका प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. कृष्णविवराची शक्ती आणि अवकाशाचा प्रचंड दाब यांच्यातील ही एक प्रकारची रस्सीखेच आहे, असे पॉल यांनी नमूद केले.
संशोधनाचे महत्त्व काय?
J1007 3540 ही दीर्घिका एक उच्च दाब वैश्विक प्रयोगशाळा म्हणून काम करत आहे. या माध्यमातून खोल अवकाशातील कठोर वातावरण एखाद्या दीर्घिकेला कशा प्रकारे आकार देऊ शकते, तिच्या उत्क्रांतीवर कसा परिणाम होतो हे अभ्यासण्याची संधी मिळाली आहे. विश्वातील सर्वांत हिंसक कोपऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गुंतागुंतीच्या भौतिकशास्त्राबाबत या संशोधनातून महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे महाकाय कृष्णविवरांचे संपूर्ण जीवनचक्र, त्यांचे सक्रिय होणे, निष्क्रिय होणे आणि पुन्हा जागृत होणे याचा अभ्यास करता येणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

