शिवछत्रपतींच्या फ्रान्समधील दुर्मीळ चित्राचा शोध

परदेशातील संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन आणखी एका चित्राचा शोध लागला आहे.

लघुचित्रशैलीतील जलरंगातील चित्र

पुणे : परदेशातील संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन आणखी एका चित्राचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतील संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेली तीन चित्रे समोर आणल्यानंतर शिवछत्रपतींच्या चित्रांचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी फ्रान्समध्येच जतन केलेले लघुचित्रशैलीतील (मिनिएचर पेंटिंग) जलरंगातील हे दुर्मीळ चित्र प्रकाशात आणले आहे.

चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची करारी आणि प्रसन्न मुद्रा दिसते. डोक्यावर शिरोभूषण आणि तुरा तसेच खांद्यावर शेला आहे. तर, डाव्या बाजूला कटय़ार आहे. कुतूबशाहीची राजधानी आंध्रप्रदेशातील गोवळकोंडा येथील गोवळकोंडा चित्रशैली प्रचलित आहे. राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी शिवाजी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना त्यांची या शैलीत अनेक चित्रे काढली गेली. त्यापैकी हे चित्र असून ते चितारणारा चित्रकार अज्ञात आहे. फ्रेंच अधिकाऱ्याने प्रस्तुत चित्रे विकत किंवा हस्तांतरित करून युरोपमध्ये पाठवली असण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रसाद तारे यांनी शुक्रवारी दिली. भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे आणि अभ्यासक राजेंद्र टिपरे या वेळी उपस्थित होते.

या चित्रासह सतराव्या शतकातील कुतूबशाह, औरंगजेब, मादण्णा या राजकीय व्यक्तींची चित्रे फ्रान्स येथील संग्रहालयात आहेत. अठराव्या शतकापासून ही सर्व चित्रे फ्रान्समधील लुईस चार्ल्स या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहात होती. तेथून ती फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहामध्ये हस्तांतरित झाली. सध्या ही सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्येच आहेत, असे तारे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discovery portrait shiv chhatrapati france ysh

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या