scorecardresearch

चर्चेपूर्वीच राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागवले

आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत निवडणूकपूर्व आघाडी होणार असल्याच्या हालचाली राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, राष्ट्रवादीने मात्र शहरातील सर्व ४६ प्रभागांमधील १३९ जागांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आघाडीसाठी अनुत्सुक?

पिंपरी : आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत निवडणूकपूर्व आघाडी होणार असल्याच्या हालचाली राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, राष्ट्रवादीने मात्र शहरातील सर्व ४६ प्रभागांमधील १३९ जागांसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. शहरात राष्ट्रवादीचे बळ जास्त असल्याचा युक्तिवाद करत शिवसेनेशी आघाडी करण्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अनुत्सुक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

पिंपरी पालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. शहरात लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे भाजपचे दोन आमदार आहेत. २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपला १२८ पैकी ७७, राष्ट्रवादीला ३६ आणि शिवसेनेला ९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मात्र खातेही उघडता आले नव्हते. अल्पावधीत भाजपची शहरात वाढलेली राजकीय ताकद लक्षात घेता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत युती करण्याचे संकेत दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच दिले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र काँग्रेस स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पटोले यांचीच री ओढत त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे पिंपरी पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. गमावलेली पालिका पुन्हा ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे आहेत. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचा भाजपशी पदोपदी संघर्ष सुरू आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर खांदेपालट करून नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादीची नवी कायर्कारिणी जाहीर करण्यात आली. आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. तुम्ही निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना केले. त्यानुसार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सोमवारपासून (७ मार्च) इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. पालिका निवडणुकीतील आघाडीविषयी वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Discussion ncp invited applications aspirants local ncp leaders reluctant lead ysh

ताज्या बातम्या