scorecardresearch

मेट्रो मार्गिकेचेही विद्रूपीकरण; खांबांवर राजकीय जाहिरात फलक लावण्यास सुरुवात

पीएमपीच्या बसथांब्यांवर, गाडय़ांवर, चौक, रस्त्यातील सार्वजनिक ठिकाणांवर बेकायदा जाहिरात फलक उभारण्याचे लोण आता मेट्रो मार्गिकेपर्यंत पोहोचले आहे.

पुणे : पीएमपीच्या बसथांब्यांवर, गाडय़ांवर, चौक, रस्त्यातील सार्वजनिक ठिकाणांवर बेकायदा जाहिरात फलक उभारण्याचे लोण आता मेट्रो मार्गिकेपर्यंत पोहोचले आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे मेट्रो मार्गिकेचे विद्रूपीकरण होत असून या प्रकाराला वेळीच आळा न घातल्यास काही दिवसांत मेट्रोचे खांब, मार्गिका, मेट्रोचे डबे, स्थानके, सरकते जिने, उद्वाहक अशी ठिकाणे अनधिकृत जाहिरात फलकांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्ते, प्रमुख चौकांत जागोजागी अनधिकृत राजकीय फलक उभारण्याची चढाओढ राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे लहानातील लहान जागेवरही जाहिरात फलकांची उभारणी केली जाते. राजकीय दबावापोटी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढीस लागला आहे. त्यातून शहराचे मोठे विद्रूपीकरण होत आहे. आता अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचे लोण आता मेट्रोपर्यंत पोहोचले आहे.

वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिकेच्या खांबांवर राजकीय जाहिरात फलक उभारण्यास सुरुवात झाली आहे. नेत्यांच्या स्वागताच्या फलकांबरोबर खासगी उद्योग-व्यवसायाच्या जाहिराती खांबांवर लावण्यात आल्या आहेत. मार्गिकेची कामे पूर्ण झाल्यानंतरही खांबांवर अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन होणार असल्याने ते तातडीने हटविण्याची दक्षता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन तसेच आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून घेण्यात आली. मात्र आता पुन्हा हाच प्रकार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या विना परवानगा जाहिरात फलक दिसत नसले तरी वेळीच असे प्रकार रोखले नाहीत तर त्याचे पेव फुटण्याची शक्यता आहे. कारवाई होत नाही, हे पाहून येत्या काही दिवसांत मेट्रोचे खांब विनापरवाना जाहिरात फलकांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता असून मेट्रोचे डबे, उद्वाहके, स्थानके, मार्गिका, सरकत्या जिन्यांवरही अशा मिळेल त्या ठिकाणी जाहिरात फलक उभारले जाण्याची भीती आहे. त्यामुळे हा प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे.  दरम्यान, विद्रूपीकरण तातडीने रोखावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ता, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त आणि महामेट्रोकडे केली आहे. विना परवाना जाहिरात फलक हटविण्याऐवजी ते लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disfigurement metro lines political billboards began erected tpoles amy

ताज्या बातम्या