पाणी जपून वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन; अन्यथा उन्हाळय़ात पाणीटंचाईची शक्यता

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाला. मात्र, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पुढील पावसाळय़ापर्यंत शहर आणि ग्रामीण भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच शहराच्या पूर्व भागाला भामा आसखेड धरणातून अडीच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नुकतेच मंजूर करण्यात आले आहे. यंदा खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने सध्या टेमघर धरणात ९६ टक्के, वरसगाव आणि पानशेत धरणांत अनुक्रमे ९७ आणि ९९ टक्के, तर खडकवासला धरणात ३६ टक्के असा एकूण ९३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी चारही धरणांत ९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार शहराला खडकवासला धरणसाखळीतून पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाणी ग्रामीण भागासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे यांनी दिली.   

नियमानुसार ग्रामीण भागाला वर्षभरातून पाच सिंचन आवर्तन देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शहरातून पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत पाचऐवजी तीनच सिंचन आवर्तने घेण्यात येत आहेत. पावसाळय़ानंतरचे पहिले सिंचन आवर्तन पुढील तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. शहरात दररोज प्रतिमाणशी ३०० लिटर पाणी वापरण्यात येत आहे. िपपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हेच प्रमाण केवळ १४९ लिटर आहे. त्यामुळे पुण्यातही प्रतिदिन प्रतिमाणशी पाण्याचा वापर कमी व्हावा. तसेच भामा आसखेड धरणातून पूर्व भागासाठी जेवढे पाणी घ्याल, तेवढे खडकवासला धरणसाखळीतील धरणांमधून पाणी कमी घ्यावे, असेही कळवण्यात आल्याचे चोपडे यांनी स्पष्ट केले.

..अन्यथा शहरात उन्हाळय़ात पाणीटंचाई

यंदा परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग मर्यादित राहिला आहे. परिणामी ग्रामीण भागातील तलाव, कालवे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरू शकलेले नाहीत. त्यामुळे सिंचन आवर्तन सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे जेवढे पाणी भामा आसखेड धरणातून घ्याल, तेवढे पाणी खडकवासला धरणसाखळीतून कमी उचलण्याबाबत जलसंपदा विभागाने पालिकेला कळवले आहे. अन्यथा उन्हाळय़ात शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.