पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर टीका करणाऱ्या डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलेली दिलगिरीची भाषा संदिग्ध असली तरी मराठी साहित्याचा आणि सारस्वतांचा उत्सव असलेल्या संमेलनाला गालबोट लागू नये म्हणून या वादावर तूर्त आम्ही पडदा टाकला आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि खासदार अमर साबळे यांनी बुधवारी जाहीर केले. पण, त्याबरोबरच ‘संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून नवे वाद होऊ नयेत याची जबाबदारी नियोजित अध्यक्षांवर राहील. त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असले तरी आपल्या विधानांचे परिणाम काय होतील हे ध्यानात ठेवून त्यांनी बोलावे’, असा इशाराही सबनीस यांना देण्यात आला आहे.
सबनीस यांनी माफी मागितल्याखेरीज त्यांना संमेलनामध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेत अमर साबळे यांनी तीव्र आंदोलन केले होते. साबळे यांचे आंदोलन ही पक्षाची भूमिका असल्याचे भंडारी यांनी स्पष्ट केले होते. त्याची दखल घेत सबनीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन एकेरी उल्लेखाबद्दल पंतप्रधानांची दिलगिरी व्यक्त करीत तसे पत्र पाठविले असल्याचे स्पष्ट केले. त्या पाश्र्वभूमीवर अमर साबळे आणि भंडारी यांनी हा वाद तूर्त मिटला असून संमेलन सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आता नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यावरच असल्याचे सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील या वेळी उपस्थित होते.
भंडारी म्हणाले, संमेलनाला भाजपने विरोध केलेला नाही. साहित्यामध्ये राजकारण असू नये ही सीमारेषा पक्ष पाळत आला आहे. मात्र, ‘या सद्गृहस्थाने’ प्रसिद्धीसाठी पंतप्रधानांविषयी वाईट शब्द वापरले तेव्हा पक्षाने भूमिका घेतली. ५ जानेवारी रोजी लिहिलेले पत्र इतके दिवस दाबून का ठेवले हा प्रश्न उपस्थित होतो. या पत्रातील दिलगिरीची भाषाही संदिग्ध आहे. तरीही मराठी भाषा आणि साहित्याच्या पवित्र व्यासपीठाचा विचार करून हा विषय थांबविला आहे.
साहित्य संमेलन सुरळीत पार पडेल, अशी ग्वाही देत अमर साबळे हे प्रारंभापासूनच संमेलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे डॉ. पी. डी. पाटील यांनी सांगितले.