scorecardresearch

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखास प्रवेश देण्यावरून भाजपमध्ये वादंग?

एकीकडे भाजप-शिवसेनेत युती होण्याविषयी चर्चा सुरू असताना शिवसेनेतून भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखास प्रवेश देण्यावरून भाजपमध्ये वादंग?

एकीकडे भाजप-शिवसेनेत युती होण्याविषयी चर्चा सुरू असताना शिवसेनेतून भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेशही दिला जात असल्याने दोन्ही पक्षात धुसफूस सुरू आहे. अशातच, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दत्तात्रय गायकवाड यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे भाजपमध्येच वाद रंगला आहे.

दत्ता गायकवाड हे दिघीतील बडे प्रस्थ आहे. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शहरप्रमुख अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. मधल्या काळात ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. आपण पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर, त्यांचे पुतणे संजय गायकवाड राजकारणात राहतील, असे चित्र होते.

यापूर्वीच्या प्रभागपद्धतीत गायकवाड यांनी दिघी-चऱ्होलीतून संपूर्ण पॅनेल निवडून आणले होते. आता चार सदस्यांच्या नव्या प्रभागात गायकवाड यांचा प्रभाव असलेला तसेच नव्याने जोडला जाणारा बोपखेल परिसर आहे. त्यामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असाव्यात, असे मानले जाते. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गायकवाड यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. गायकवाड यांना ज्या पद्धतीने प्रवेश देण्यात आला, त्यावरून भाजपच्या एका गटात अस्वस्थता आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरही हा विषय गेल्याचे सांगण्यात आले.

तुषार हिंगे भाजपमध्ये

पालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोरवाडी प्रभागात शिवसेनेचे उमेदवार असलेले तुषार हिंगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिगे यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, ते कोणत्याही पक्षात नव्हते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2016 at 05:32 IST