पुणे : उत्तरेकडील थंडीची लाट ओसरल्याने राज्यात गुरुवारपासून रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन गारवा कमी होणार आहे. विदर्भातील थंडीची लाट बुधवारीही कायम होती, मात्र या विभागातही तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूर वगळता इतरत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, चंडीगड, दिल्ली, हरियाणा आदी राज्यांत तीन दिवस थंडीची तीव्र लाट आली होती. त्याचा परिणाम मध्य प्रदेशापाठोपाठ विदर्भातही जाणवला. राज्याच्या सर्वच भागांत तीन ते चार दिवस रात्रीचे किमान तापमान सरासरीखाली जाऊन गारवा वाढला. विदर्भात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ४ ते ८ अंशांनी घटल्याने या विभागात थंडीची लाट निर्माण झाली. मध्य प्रदेशच्या पूर्व भागात सध्याही थंडीची लाट कायम असल्याने बुधवारीही विदर्भातील तापमानाचा पारा घसरलेला होता. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्याने या भागात कडाक्याची थंडी जाणवते आहे. राज्यात सध्याही निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाची स्थिती आहे.

कारण काय?

उत्तरेकडील थंडीची लाट ओसरली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस गारवा राहणार असला, तरी काही प्रमाणात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २४ डिसेंबरनंतर काश्मीर, हिमालयाच्या पट्ट्यात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात या कालावधीत काही प्रमाणात गारवा टिकून राहण्याची शक्यता आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत तापमानात फार मोठी घट होणार नाही.

हवाभान…

राज्यातील सर्वाधित थंडी सध्या विदर्भात असली, तरी नीचांकी तापमान मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. बुधवारी विदर्भातील अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आदी भागांतील तापमानाचा पारा ८ ते ९ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सोलापूरमध्ये ११ ते १२ अंशांवर किमान तापमान होते. कोकण विभागात रत्नागिरीत किमान तापमान अद्यापही सरासरीखाली आहे. औरंगाबाद, परभणी, बीड आदी भागांत १० ते ११ अंशांवर किमान तापमान होते.

Story img Loader