पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगलेली असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून गुरुवारी हेल्मेटच्या वापराबाबत आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्याची चर्चा होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नसेल असं स्पष्ट केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सर्वसामान्यांना हेल्मेटसक्ती नसेल असं सांगितलं आहे. याउलट नागरिकांचं प्रबोधन केलं जाईल असं सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी सांगितलं आहे.

“हेल्मेटचा वापर न केल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. ती टाळण्यासासाठी हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. याची सुरुवात शासकीय कार्यालयातील आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी करावी. त्यांनी सर्वांसमोर उदाहरण ठेवावं,” असं राजेश देशमुख यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “आयुक्तांच्या सूचनेनुसार आदेशवजा परिपत्रक काढलं आहे. पहिल्या टप्प्यात सक्ती करणार नसून प्रबोधन करणार आहोत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना विनंती करणार आहोत. यावेळी त्यांना हेल्मेटचे फायदे सांगणार आहेत. पहिल्या टप्प्यात लोकांना आणि अधिकाऱ्यांना हेल्मटे वापरावं यासाठी प्रबोधन करणार आहोत, सक्ती अजिबात नाही”.

पुण्यात १ एप्रिलपासून हेल्मेटसक्ती असल्याने आदेश प्रशासनाने दिले होते. सर्व ठिकाणी हेल्मेट बंधनकारक असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. चार वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं असेल असं सांगण्यात आलं होतं. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले होते. मात्र आता हेल्मेटसक्ती नसेल असं आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.