पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती ; गट-गणांची आरक्षण सोडत १३ जुलैला

जिल्हा परिषदेचे ८२ गट, तर १६४ पंचायत समिती गण निश्चित झाले असून, अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध झाली आहे.

Pune District Council
पुणे जिल्हा परिषद ( संग्रहित छायचित्र )

जिल्हा परिषदेचे ८२ गट, तर १६४ पंचायत समिती गण निश्चित झाले असून, अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध झाली आहे. आता १३ जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे. त्यात जिल्हा परिषद गटांची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसीलदार यांच्या उपस्थित होणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गट आणि गणांची प्रभाग रचना अंतिम झाली. नव्या रचनेनुसार ८२ गटांची निर्मिती झाली, तर त्याच्या दुप्पट १६४ गण तयार झाले. त्यानुसार आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यात अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना ७ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख १५ जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. १५ ते २१ जुलै दरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. २५ जुलैला आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहेत. २९ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोग हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन आरक्षणास मान्यता देण्यात येणार आहे, तर राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर २ ऑगस्ट रोजी आरक्षणाचे राजपत्र जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

आरक्षित गट, गण संख्या पुढीलप्रमाणे

पुणे जिल्हा परिषदेचे ८२ गट आणि १६४ गण आहेत. यातील ४१ गण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी आठ गट आरक्षित असून त्यातील चार गट महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा गट आरक्षित आहेत. त्यातील तीन महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटातील ६८ गट असून त्यातील ३४ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. पंचायत समित्यांचे १६४ गण आहेत. त्यातील ८२ जागा महिलांसाठी असून एकूण गणांपैकी १३९ गण सर्वसाधारण आहेत. त्यातील ६८ जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण १५ गण आहेत, त्यातील नऊ गण महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीकरिता एकूण दहा गण आरक्षित असून त्यातील पाच गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: District council panchayat samiti leaving group reservation 13th july pune print news amy

Next Story
पुणे : शहरात तेरा ठिकाणी झाडे पडली ; अग्निशमन दलाकडून झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत
फोटो गॅलरी