पुणे: शासकीय आरोग्यविषयक महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा करणे आणि वरिष्ठ स्तरावरील महत्त्वाच्या बैठकीला विनापरवाना गैरहजर राहणे पुण्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने या दोघांनाही आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून तत्काळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिक्लिनिक्स तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांसारख्या विविध आरोग्य उपक्रमांमधील प्रगती व कामांचा आढावा घेण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. ही बैठक सोमवारी, २७ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे परिमंडळासाठी घेण्यात आली.

या बैठकीला आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित राहण्याचे स्पष्ट व लेखी आदेश आरोग्य विभागाकडून १७ जुलै २०२६ च्या पत्राद्वारे दोन्ही अधिकाऱ्यांना आधीच देण्यात आले होते. तरीसुद्धा, डॉ. रामचंद्र हंकारे आणि डॉ. अंबादास देवमाने हे दोघेही कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा परवानगी न घेता या अत्यंत महत्त्वाच्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहिले.

या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांना शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याबाबत कोणतेही गांभीर्य व स्वारस्य नसल्याचे यावरून स्पष्ट होते,” अशा शब्दांत नोटिसीमध्ये त्यांच्यावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांनी १२ ऑगस्ट रोजी ही नोटीस जारी केली असून, अधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.