पुणे : आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवे घाट सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

दिवे घाटात नियंत्रित स्फोटाद्वारे (ब्लास्टिंग टेक्नोलाॅजी) रुंदीकरण करण्यात येणार आहे. घाटातील डोंगर रांगा, कपारीत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवे घाट गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. दिवे घाटातून सासवड, तसेच पुण्याकडे जाणाऱ्य वाहनांनी कोंढव्यातील बोपदेव घाटमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे. सासवड, पुण्याहून दिवे घाटमार्गे जाणारी एसटी बस, पीएमपी बस सेवा बोपदेव घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बोपदेव घाटाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सासवड परिसरातील अनेक जण कामानिमित्त पुणे शहरात दररोज येतात. अनेक जण खासगी ठिकाणी नोकरी करतात.

शहरातील विविध शिक्षण संस्थात सासवड परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर बाहेर पडावे. स्वारगेट एसटी स्थानकातून पंढरपूर, फलटण, नातेपुते, अकलूज, बारामती, नीरा, जेजुरीकडे जाणाऱ्या एसटी गाड्या दिवे घाटाचा वापर करतात. पीएमपी बस सेवा दिवे घाटातून जाते. गुरुवारी सकाळी अकरानंतर दिवे घाट तीन तास बंद ठेवण्यात येणार असल्याने नोकरदार, विद्यार्थी, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोपदेव घाटामार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. सोलापूर रस्त्याने सासवडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ऊरळी कांचन येथील शिंदेवणे घाट रस्ता मार्गे सासवडकडे जावे.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी पूर्णपणे ठप्प झाली. ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी उलटला. त्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. या टँकरमधून होणारी गॅस गळती तातडीने थांबविण्यात यश न आल्याने बुधवारीही द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कोंडीत चोवीसहून अधिक तास अडकलेल्या प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल झाले. सायंकाळपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. टँकरमध्ये प्रोपलेेन गॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याने घटनास्थळी रासायनिक तज्ज्ञांना बोलाविण्यात आले होते. बोरघाट पोलीस, आयआरबीचे पथक, महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.