पिंपरी : दिवेआगरला सहलीला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे कळताच पालक, नातेवाइकांनी आळंदीतील संबंधित विनर्स अकादमीकडे धाव घेतली होती. अकादमी बंद असल्याने आणि कोणाशीही संपर्क होत नसल्याने नातेवाइक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. त्यामुळे गुरुवारी रात्री तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तेथे बंदोबस्त वाढविला होता. दरम्यान, या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शुक्रवारी अत्यावश्यक सेवा वगळून आळंदी शहर बंद ठेवण्यात येणार आहे. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी बंदचे आवाहन केले आहे.

आळंदी येथील मरकळ रस्त्यालगतच्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ही खासगी अकादमी आहे. येथे वैद्यकीय अभ्यासक्रम (नीट) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी (जेईई-मेन) प्रवेश परीक्षांच्या तयारीचे वर्ग घेतले जातात. येथील २५ विद्यार्थी, १७ विद्यार्थिनी आणि ६ शिक्षक, असे एकूण ४८ जण दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. विद्यार्थ्यांकडून सहलीचे अर्ज भरून घेण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपये शुल्क घेण्यात आले होते.

समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत असताना पाण्याचा आणि भरतीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. ही माहिती आळंदी परिसरात पसरली. पालकांनी तत्काळ अकादमीकडे धाव घेतली. कार्यालय बंद होते. अकादमीचे कोणीही तिथे उपस्थित नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. नातेवाइकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आळंदी पोलिसांनी या परिसरात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते.

दरम्यान, सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक श्रीवर्धनकडे रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे पालक श्रीवर्धनकडे पोहोचले. ‘अकादमीच्या शिक्षकांशी संपर्क साधला जात आहे. विद्यार्थ्यांचे पालक श्रीवर्धनला गेले आहेत,’ असे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरखडे यांनी सांगितले.
आळंदी परिसरातील सहलीला गेलेल्या अकादमीच्या आठ मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. रायगड पोलिसांनी अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची, तसेच स्थानिक प्रशासनाने डॉक्टरांची संख्या वाढवली आहे. प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत. आळंदी पोलीस मुलांच्या पालकांना सर्वोतोपरी मदत करत असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.

आळंदी आज बंद

दिवेआगर दुर्घटनेत प्राण गमावलेल्या आळंदीतील ८ निष्पाप विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यावश्यक सेवा वगळून ‘आळंदी बंद’ची हाक देण्यात आली आहे. सर्व व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले आहे.