पुणे : दिवेआगर येथील समुद्रात पुण्यातील आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांचे पालक काल रात्री तातडीने दिवेआगर येथे रवाना झाले आहेत. समुद्रात बुडून मुलांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आता आळंदी नगरपरिषदेने मोठा निर्णय घेतला आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या मार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची जागेत विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.

विनर्स अकादमी या आस्थापनेने क्लास चालविण्यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना, ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली.

या कार्यवाही दरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. असे आळंदी नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्पष्ट केले.

नक्की कुठे आहे विनर्स अकादमी

आळंदी येथील मरकळ रस्त्यालगतच्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ही खासगी अकादमी आहे. येथे वैद्यकीय अभ्यासक्रम (नीट) आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी (जेईई-मेन) प्रवेश परीक्षांच्या तयारीचे वर्ग घेतले जातात. येथील २५ विद्यार्थी, १७ विद्यार्थिनी आणि ६ शिक्षक, असे एकूण ४८ जण दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते.

विद्यार्थ्यांकडून सहलीचे अर्ज भरून घेण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून दोन हजार रुपये शुल्क घेण्यात आले होते. समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत असताना पाण्याचा आणि भरतीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी खोल पाण्यात बुडाले. ही माहिती आळंदी परिसरात पसरली. पालकांनी तत्काळ अकादमीकडे धाव घेतली. कार्यालय बंद होते. अकादमीचे कोणीही तिथे उपस्थित नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. नातेवाइकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आळंदी पोलिसांनी या परिसरात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते.