येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याला एक महिन्यांची संचित रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आली आहे. संजय दत्तच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याने पॅरोल मागितला होता. तो विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. आज किंवा उद्या संजय दत्त येरवडा कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांच्या शिक्षेच्या कालावधीत संजय दत्त याने संचित आणि अभिवचन (फर्लो) रजेवर १३२ दिवस बाहेर काढले आहेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील त्याने अठरा महिने शिक्षा भोगली आहे. २१ मे २०१३ पासून संजय दत्त येरवडा कारागृहात आहे. सुरुवातीला साडेचार महिने शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्तने स्वत:च्या पायाच्या दुखण्याचे कारण देत ऑक्टोबर महिन्यात चौदा दिवसांची संचित रजा घेतली. त्यात पुन्हा आणखी चौदा दिवसांची वाढ मागून घेतली. २८ दिवस अभिवचन रजेवर जाऊन आल्यानंतर पत्नीच्या आजारपणाचे कारण देत विभागीय आयुक्तांकडून त्याने २१ डिसेंबर २०१३ रोजी तीस दिवसांची संचित रजा मिळवली. त्यामध्ये सलग दोन वेळा मुदतवाढ त्याने घेतली होती. २१ मार्च २०१४ मध्ये तो पुन्हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला होता. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०१४ मध्ये त्याला चौदा दिवसाची अभिवचन रजा मिळाली होती. म्हणजे २१ मे २०१३ पासून आतापर्यंत त्याने १३२ दिवस कारागृहाबाहेर काढले होते. त्याला देण्यात येणाऱ्या संचित व अभिवचन रजेच्या विरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत कारागृहाकडून दिल्या जाणाऱ्या फर्लो आणि पॅरोल यामध्ये मोठे बदल करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले होते.