‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ ही संस्था नावाप्रमाणेच रंगमंचावरील आणि जीवनातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यरत आहे. या संस्थेने सुरू केलेल्या ‘दिवाकर स्मृती नाट्यछटा’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारपासून (दि.१८) पुण्यातील विविध केंद्रांवर सुरू होईल. यानिमित्ताने ‘नाट्यसंस्कार’चे संस्थापक-विश्वस्त प्रकाश पारखी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
‘नाट्यसंस्कार’च्या स्थापनेमागचा उद्देश काय होता?
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यप्रशिक्षण या ध्येयाने १९७८ मध्ये सुरू झालेली ही संस्था सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसूत्रीद्वारे सुरू असलेले आजपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे ‘दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’. यंदा या स्पर्धेचे ३५ वे वर्ष आहे.
नाट्यछटा स्पर्धांना सुरुवात कशी झाली?
- नाट्यछटा सादरीकरणातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग होऊ शकतो, हे सर्वांना समजावे यासाठी केलेली धडपड म्हणजे या स्पर्धा आहेत. त्यासाठी नाट्यछटा लेखन कार्यशाळा, नाट्यछटा लेखन पुरस्कार, पुरस्कारप्राप्त नाट्यछटांची पुस्तके प्रकाशित करणे आदी साहाय्यभूत गोष्टी करण्यात येत आहेत. ही स्पर्धा घेत असताना नाट्यछटा म्हणजे काय, ती कशी लिहावी, कशी सादर करावी, स्पर्धा कशा घ्याव्यात, परीक्षण कसे करावे, यासाठीही वर्षानुवर्षे कार्यशाळा घेण्यात येतात. त्यात दिवाकरांबद्दल, तसेच नाट्यछटा म्हणजे काय, याची माहिती दिली जाते. नाट्यछटा प्रकार समजायला सोपा जाईल म्हणून ‘गजरा नाट्यछटांचा’ या कार्यक्रमाद्वारे विविध ठिकाणी नाट्यछटा सादरीकरणाचे प्रयोगही केले जातात.
या उपक्रमांतून नाट्यछटा लेखनास कसे प्रोत्साहन मिळाले?
सर्वांत प्रथम दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखन प्रकार शंभरहून अधिक वर्षांपूर्वी साहित्यात आणला, पण त्यानंतर १९९२ पासून दिवाकर स्मृती नाट्यस्पर्धा सुरू झाल्या. त्यापूर्वी नाट्यछटा हा साहित्य प्रकार केवळ चार-पाच लेखकांनी हाताळण्याचा प्रयत्न केला होता. या स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र शेकडो लेखकांनी हजारो नाट्यछटा लिहिल्या. संस्थेने नाट्यछटांची पुस्तकेही प्रकाशित केली. ही अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही कष्ट घेतेले. या लेखकांमध्ये शिक्षक, तसेच पालकही आहेत. आत्ताच्या शालेय अभ्यासक्रमात सुनंदा उमरजी आणि क्षितिजा आगाशे यांच्या नाट्यछटांचा समावेश असून, या दोघीही संस्थेशी संलग्न आहेत.
या स्पर्धेचे अजून वैशिष्ट्य काय?
नाट्यछटेला रंगभूषा, वेशभूषा जशी वेगळी करावी लागत नाही, तसेच वेगळा रंगमंच, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना काहीही लागत नाही. पार्श्वभूमीही सांगावी लागत नाही. फक्त तीन मिनिटांच्या अवधीत अभिनयाचे सर्व प्रकार हाताळता येऊ शकतात. या सादरीकरणाला विषयाचे बंधन नसले, तरी नाट्यछटा वयोगटाला साजेशी असावी, अशी मात्र आमची अट असते. या सादरीकरणात एक नाट्यप्रसंग एकच व्यक्ती प्रेक्षकांसमोर साकारते. एकपात्रीप्रमाणे इतर वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका वठवाव्या लागत नाहीत. सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या स्पर्धा वाढत्या लोकप्रियतेमुळे आता सर्व वयोगटांसाठी घेतल्या जातात. आणखी एक म्हणजे नाट्यछटा स्पर्धेमुळे इंग्रजी माध्यमातील मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, हेही मला तेवढेच महत्त्वाचे वाटते.
या स्पर्धांचा सर्वत्र प्रसार कसा काय केलात?
सुरुवातीला पुणे केंद्रावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडहून स्पर्धक भाग घेऊ लागले. मग सुरुवातीला चिंचवड केंद्र आणि त्या पाठोपाठ पिंपरी-निगडी-हिंजवडी अशी केंद्र वाढत गेली आहेत. तेथे प्राथमिक फेरीबरोबरच अंतिम फेरीही स्वतंत्रपणे घेतली जाते. ‘बालरंगभूमी परिषदे’चे अध्यक्षपद भूषवित असताना या स्पर्धा महाराष्ट्रभर पोहोचल्या. त्यातही अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. प्रचार, प्रसारामुळे मध्य प्रदेशातही स्पर्धा पोहोचली. तेथे इंदूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वाढत्या प्रतिसादासह स्पर्धा सुरू आहे. मोहन रेडगावकर यांच्या ‘मुक्त संवाद’ या संस्थेतर्फे त्या आयोजिल्या जातात. परदेशातील वास्तव्यात तेथेही ‘दिवाकर’ आणि ‘नाट्यछटा’ याविषयी व्याख्यान दिले आणि त्याद्वारे नाट्यछटा हा विषय साता समुद्रापलीकडे पोहोचला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुरुवातीच्या काळात नाट्यछटा स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अनेकांना ऑडिशनसाठीदेखील या कलाप्रकाराचा उपयोग झाला आहे.
shriram.oak@expressindia.com
