लक्ष्मीपूजन साहित्य खरेदीची लगबग ; बाजारात फुलांची मोठी आवक, झेंडू स्वस्त

लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेणू चौक परिसरात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी बुधवारी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पूजसाहित्य, फुले खरेदीसाठी मंडई तसेच उपनगरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. व्यापारी बांधवांनी प्रथेप्रमाणे रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातून कीर्द, खतावणीची खरेदी केली.

यंदाच्या वर्षी बाजारात फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक झाल्याने झेंडूसह सर्व फुलांच्या दरात घट झाल्याची माहिती फूल बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. लक्ष्मीपूजनासाठी झेंडूला मागणी असते. त्यामुळे झेंडूचे दर तेजीत असतात. झेंडूसह हारांसाठी शेवंतीच्या फुलांना मागणी असते. हार तसेच सजावटीसाठी  तोरणे तयार केली जातात. किरकोळ बाजारात झेंडूला प्रतवारीनुसार ३० ते ८० रुपये किलो असा दर मिळाला

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूलबाजारात बुधवारी (३ नोव्हेंबर) पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झेंडू विक्रीस पाठविला. शेवंतीच्या फुलांची आवक नगर तसेच पुणे जिल्हयातून झाली. सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येणाऱ्या फुलांची प्रतवारी चांगली असल्याचे फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेणू चौक परिसरात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कोथरूड, कर्वेनगर, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज, वारजे, येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी परिसरातील बाजारपेठेत पूजासाहित्य तसेच झेंडू विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. उपनगरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. व्यापारी बांधवांनी प्रथेप्रमाणे रविवार पेठेतील बोहरी आळीतील व्यापाऱ्यांकडून कीर्द, खतावणीची खरेदी केली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कीर्द, खतावणीचे पूजन करण्याची प्रथा आहे. व्यापारी बांधवांनी बोहरी आळी परिसरात खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केली होती. गेल्या वर्षी दिवाळीत फुलांना चांगले दर मिळाले होते. यंदाच्या वर्षी मंदिरे खुली झाली आहेत. यंदा शेतकऱ्यांनी फुलांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली आहे. दिवाळीमुळे सध्या बाजारात फुलांची मोठी आवक होत असून फुलांचे दर घटले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे दरात निम्म्याहून कमी झाले आहेत.

सागर भोसले, फूल व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

फुलांचे किरकोळ बाजारातील दर

*   मोठा झेंडू- ६० ते ८० रुपये

*   छोटा झेंडू- २० ते ४० रुपये

*   शेवंती- ३० ते ८० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 all flowers including marigolds prices come down in pune zws

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या