हर्ष उल्हासाच्या दीपोत्सवाचा प्रारंभ ; अंधार दूर करून प्रकाशाची वाट जागविणाऱ्या दिवाळीचा मोठा आनंद

दिवाळी पाडव्याला शहरातील मंदिरांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो.

पुण्यात आतषबाजीने आसमंत उजळून निघाले.

पुणे : प्रत्येकाच्या मनाची आस जागवीत अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखविणारा दीपोत्सव हा सर्वाच्या मनामध्ये हर्ष आणि उल्हास घेऊन येतो, याची प्रचिती यंदाच्या दिवाळीमध्ये येत आहे. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ असे म्हणत एका पणतीने दुसरी पणती प्रज्वलित करून उत्साहाला आनंदाची लयलूट करण्यासाठी सारे सज्ज झाले आहे.

दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण. अंधार दूर करणारी मिणमिणती पणती आणि आकाशाशी नाते जोडत प्रकाशमान करणारा आकाशकंदील अशा प्रकाशाच्या पारंपरिक आणि आधुनिक साधनांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दिवाळीच्या आनंदाला सुरक्षित अंतराची बंधने होती. करोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे निर्बंध शिथिल झाले असून यंदाच्या दिवाळीमध्ये नवा उत्साह असला, तरी जागरूकतेचे भान सांभाळावे, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सैनिक मित्र परिवार आणि शहरातील गणेश मंडळाच्या विधायक व्यासपीठातर्फे देशाच्या रक्षणासाठी पराक्रम करणारे जवानांचे कुटुंबीय, अपंग सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी यांच्यासमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात येतो.   

दिवाळी पाडव्याला शहरातील मंदिरांसह विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. तळय़ातला गणपती म्हणजेच सारसबाग येथील मंदिरामध्ये हजारो पणत्या प्रज्वलित करून सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याची पुणेकरांची प्रथा आहे. भल्या पहाटे दीपोत्सवासाठी आणि पाडवा पहाट कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये भाविक येतात हा दरवर्षीचा अनुभव आहे.  शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दिवाळी पाडव्यानिमित्त शुक्रवारी (५ नोव्हेंबर) एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात सायंकाळी सहा वाजता आठ हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळय़ात सहभाग घेणाऱ्या स्वराज्यघराण्यांतील वारसांचा श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 diwali celebration diwali spreading the lights of happiness zws

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या