दिवाळी म्हणजे आप्तेष्टांना भेटून केलेली मजा, फराळाचा आस्वाद आणि बरंच काही..! पण ‘ते’ सगळे दिवाळीतसुद्धा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच असतात. ‘आयसीयू’तल्या ऑक्सिजनच्या नळ्या, डायलिसिसची यंत्र, सामान्य माणसाला घाबरवून टाकणारा ‘बीप-बीप’ आवाज करणारी वैद्यकीय उपकरणे यांच्या सान्निध्यातल्या रुग्णाला बरे करण्याच्या धावपळीतच ‘त्यां’ची दिवाळी सुरू असते.. ‘ते’ आहेत अतिदक्षता विभागातले डॉक्टर.
अतिदक्षता विभागात डॉक्टर उपलब्ध नाही, असे कधीही घडत नाही. त्यामुळे बाहेरगावच्या डॉक्टरांनाही दिवाळीला एकदम सुट्टय़ा देता येत नाहीत. फटाक्यांमुळे होणाऱ्या जखमांचे रुग्ण या काळात वाढतात, त्यामुळे विशेषत: बालरुग्णांच्या अतिदक्षता विभागात गडबड असते. परिचारिका, वॉर्डबॉइज, डॉक्टर असे आम्ही सगळेच सणाला रुग्णालयात असलो, तरी जबाबदारीच्या जाणिवेमुळे त्याचे वाईट वाटत नाही, असे मनोगत रुबी हॉस्पिटलच्या आयसीयू प्रमुख डॉ. प्राची साठे व्यक्त करतात. त्या म्हणाल्या, ‘मुलांना आईने घरात असले पाहिजे असे खूप वाटते. पण पुण्यात असताना अतिदक्षता विभागाचा ‘राउंड’ घेतला नाही असा एकही दिवस जात नाही. दिवाळीला रुग्णालयातले वातावरणही नेहमीपेक्षा निराळे असते. विविध विभागांची त्यांच्यापुरती का होईना, पण पार्टी होते. मी दर दिवाळीत प्रत्येकासाठी छोटीशी भेटवस्तू घेऊन जाते. रुबी रुग्णालयात दसऱ्याला नित्यनेमाने पूजा करणे हा डॉ. ग्रँट यांनी घालून दिलेला नियमच आहे. यंदा अतिदक्षता विभागातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या हातून आम्ही पूजा केली. रुग्ण बरा झाला की त्यांचे नातेवाईक आवर्जून डॉक्टरांना ‘आता तुम्ही सुट्टी घ्या,’ असे सांगून जातात!’
संजीवनी रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग संचालक डॉ. सुभाल दीक्षित म्हणाले, ‘अतिदक्षता विभागात दिवाळीची सजावट किंवा पणत्या लावणे हे शक्यच नसते; पण त्यातही कुणीतरी एखादा फुलांचा गुच्छ ठेवून, आकाशकंदील लावून ‘शुभ दीपावली’चा संदेश फळ्यावर लिहून जाते. इतर दिवसांपेक्षा या दिवशी नातेवाइकांना रुग्णाला थोडा अधिक वेळ भेटण्याची परवानगी दिली जाते किंवा अतिदक्षता विभागातील जो रुग्ण खाऊ शकत असेल, तर त्याला फराळाचा एखादा पदार्थ खायची मुभा मिळते. या छोटय़ा गोष्टींनीही रुग्णांची ‘मूड’ चांगला होतो.’
दिवाळी आणि नाताळ याच्या सुट्टय़ा आयसीयूतील कर्मचारी परस्पर सामंजस्याने घेतात, प्रसंगी ‘डबल डय़ूटी’ करतात, असे चिंचवडच्या निरामय रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मी दिवाळीत आयसीयूच्या कर्मचाऱ्यांसाठी मिठाई घेऊन जातो. जेव्हा विभागात धावपळ नसते तेव्हा थोडा वेळ गप्पा मारणे, एकमेकांना आठवणी सांगणे अशा गोष्टींनी वातावरणात चैतन्य येते. एकदा मला घरातले लक्ष्मीपूजन अर्धवट सोडून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी जावे लागले होते. काम संपवून मी घरी आलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते! त्या वेळी घरच्यांची चिडचिड होते. त्यांना वेळ देता येत नाही म्हणून काही वेळा दु:खही होते, पण त्याच वेळी डॉक्टर म्हणून रुग्ण वाचल्याचा आनंद असतो.’

दोन वर्षांपूर्वी नरकचतुर्दशीच्या पहाटे साडेचार वाजता एक रुग्ण हृदयविकाराच्या झटक्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल झाला होता. साडेसात वाजेपर्यंत त्या रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत आम्ही सर्व डॉक्टर आयसीयूमध्येच होतो. दहा वर्षांपूर्वी असाच एका बाईंना ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्या त्यातून बऱ्याही झाल्या आणि गेली दहा वर्षे त्यांचा दर दिवाळीत न चुकता शुभेच्छा देणारा दूरध्वनी येतो.
– डॉ. सुभाल दीक्षित