पुणे : कोळशाअभावी देशातील ४५ टक्के औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडण्याच्या वाटेवर असून, ८७ प्रकल्पांमध्ये आवश्यक नियमन साठ्याच्या २५ टक्क्यांहून कमी कोळसा शिल्लक असल्याचे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालातून समोर आले आहे. सायंकाळच्या वीजेची गरज पुरवण्यासाठी याच विजनिर्मिती केंद्रांवर अवलंबून राहावे लागत असल्याने दिवाळीच्या तोंडावर सायंकाळच्या विजेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने रविवारी (११ ऑक्टोबर) जाहीर केलेल्या दैनिक कोळसा साठा अहवालानुसार, देशातील १९१ वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी ८७ प्रकल्पांमधील कोळशाचा साठा अत्यंत चिंताजनक आहे.
एल-निनो आणि वाढत्या तापमानामुळे देशातील वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सायंकाळच्या वीजेची गरज भागविण्यासाठी सर्व औष्णिक वीजनिर्मिती केंद्र पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत आहेत. देशातील १९१ औष्णिक वीजनिर्मितांची एकूण क्षमता २ लाख २५ हजार १८८ मेगावॅट आहे. या प्रकल्पांसाठी कोळशाच्या ६१२ लाख टन नियमन साठ्याची गरज असते. सध्या आवश्यकतेच्या केवळ ३४ टक्के म्हणजे २०९ लाख टन कोळसा उपलब्ध आहे. देशांतर्गत कोळशावर चालणाऱ्या ७९ प्रकल्पांवर कोळशाची टंचाई आहे, तर आयात कोळशावर चालणारे ६ प्रकल्प गंभीर स्थितीत आहेत.
खाणीपासून दूर असलेल्या प्रकल्पांवर परिणाम
कोळसा खणीपासून असलेल्या जास्त अंतरावर असलेल्या प्रकल्पांवर विशेष परिणाम झाला असून, खाणीपासून दूर असलेल्या १५८ प्रकल्पांकडे आवश्यकतेच्या केवळ २९ टक्के साठा शिल्लक आहे. यातील ७३ प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. तर खाणीजवळच्या १८ प्रकल्पांकडे आवश्यकतेच्या ४८ टक्के साठा उपलब्ध आहे. यातील ६ प्रकल्पांमध्ये कोळशाची टंचाई आहे.
महानिर्मितीच्या प्रकल्पांबाबत प्रश्न
महानिर्मितीच्या भुसावळ, चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, नाशिक, पारस, परळी या सातही प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा कमी आहे. हे प्रकल्प सुमारे १० हजार २०० मेगावॅट क्षमतेने चालतात. या प्रकल्पांमध्ये कोळशाचा ३५.१३ लाख टन नियमन साठा असणे गरजेचे आहे. आता मात्र केवळ ६.३५ लाख टन कोळसा उपलब्ध आहे. महानिर्मितीकडे एकूण गरजेच्या केवळ १८ टक्के कोळसा उपलब्ध आहे.
वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच कोळशाची टंचाई दूर होईल. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. महानिर्मितीच्या प्रकल्पांबाबत राज्य सरकारला वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, त्यासाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. – श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री
