झगमगत्या प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज, दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी
पुणे : अंधार दूर करून प्रत्येकाच्या जीवनात झगमगते प्रकाशाचे पर्व घेऊन येणाऱ्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी शहरातील सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व प्रकारच्या खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे बाजारपेठांमध्ये चैतन्याची अनुभूती येत आहे. कपड्यांपासून गृहोपयोगी वस्तूंच्या मागणीमुळे बाजारपेठेला दिवाळी खरेदीचा साज लाभला आहे.
आली माझ्या घरी ही दिवाळी असे म्हणत बाळगोपाळांपासून ते घरातील प्रत्येकजण दिवाळीचे स्वागत करण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी ही त्याची साक्ष देत आहे. दुकानांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि आकर्षक सवलत ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करीत आहे. करोना प्रादुर्भावाचे सावट कमी झाल्याने सारेच या प्रकाशाच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. शहराच्या मध्य भागातील रस्त्यांवरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. ऑनलाइन खरेदी करण्याच्या काळातही दुकानांमध्ये जाऊन खरेदी करण्याची मौज अनेकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे कुटुंबासह खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. ब्रँडेड कपडे, वेगेवेगळ्या प्रकारच्या साड्या, बालकांचे कपडे खरेदी करताना खिसा रिकामा होत असला तरी घरातील सदस्यांच्या आनंदासाठी मोल देताना हात आखडता घेतला जात नाही याची प्रचिती दिवाळीच्या काळात येते, असा अनुभव व्यापाऱ्यांना येतो.
नोकरदार महिलांकडून फराळ्याच्या तयार पदार्थांना मागणी वाढत आहे. त्यामुळे घरगुती स्वरुपाचे फराळाचे पदार्थ तयार करून देणाऱ्या महिला बचत गटांसह छोट्या व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे. मिठाई, सुकामेव्याचे बॉक्स यांची मागणी वाढत आहे. फराळाच्या पदार्थांसाठी लागणारे जिन्नस एकत्र देणाऱ्या दिवाळी सरंजाम योजनांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बाळगोपाळांसाठी कपडे खरेदी करण्याबरोबरच किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती आणि किल्ल्यावर ठेवण्याची चित्रे खरेदी करण्यासाठी कुंभारवाडा परिसरातील व्यावसायिकांकडे गर्दी होत आहे. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर आता अनेक ठिकाणी कन्व्हर्टर वापरले जात असले तरी खास दिवाळीसाठी अंधार दूर करणाऱ्या पणत्यांच्या खरेदीला पसंती दिली जात आहे.
करोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षीची दिवाळी साधेपणाने साजरी झाली होती. यंदा निर्बंध काहीसे दूर झाल्याने आकाश मोकळे झाले आहे. बाजारपेठमध्ये दिवाळीचा उत्साह आहे. – पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर