पुणे : निरोगी आयुष्याची आस प्रत्येकाला असते. त्यासाठी विविध प्रकारचे आहार आणि वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचे सोशल मीडियावर (सोशल मीडिया) पेव फुटले आहे. दररोज नवीन ट्रेंडनुसार आहार आणि व्यायाम बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली ‘दीक्षित पॅटर्न’चे प्रणेते आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मांडली आहे. याचवेळी समाज माध्यमांवर आरोग्याबाबत चुकीच्या माहितीचा भडिमार होत असून, कोणती माहिती शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे आणि कोणती दिशाभूल करणारी आहे, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी सुचेता स्वास्थम यांच्या वतीने विकसित केलेल्या ‘स्वास्थम’ या मोबाईल उपयोजनाचे (ॲप) नुकतेच अनावरण झाले. ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, एनईएफ कनेक्टचे संस्थापक गणेश नटराजन आणि बायोरॅड मेडिसिसचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले की, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. परंतु सध्या समाज माध्यमांमुळे माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. प्रत्येकजण स्वतःला तज्ज्ञ समजू लागला आहे. कोणती माहिती शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे आणि कोणती दिशाभूल करणारी आहे, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. आजार बरा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, परंतु माणूस आजारीच पडू नये यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ‘स्वास्थम’सारख्या उपक्रमांची समाजाला गरज आहे.

सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी शरीरावर आणि एकूण जीवनमानावर खोल परिणाम घडवते, असे जितेंद्र हेगडे म्हणाले. जीवन जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, तसेच निरोगी राहण्यासाठी आरोग्यशिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजाला योग्य आरोग्यदिशा दाखवणारे ‘स्वास्थम’सारखे उपक्रम काळाची गरज आहेत, असे नटराजन यांनी नमूद केले.

ॲपच्या अनावरणानंतर आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रात डॉ. राजेश धोपेश्वरकर, डॉ. अतुल राक्षे, मेजर विशाल कराड, डॉ. विनिता केतकर, डॉ. किरण खरात आणि डॉ. पुष्कर खैर यांनी आपले विचार मांडले. यावेळी उद्योगपती सुनील देशमुख आणि सुचेता स्वास्थमचे मार्गदर्शक व सल्लागार विनोद शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘स्वास्थम’ उपयोजनाच्या प्रारंभिक चाचणी टप्प्यात योगदान दिल्याबद्दल परिचारिका रूपाली कसबे, नेहल जावळे, नीलम शेख, नंदिनी शेट्ये, संजय कुर्हाडे आणि कांचन देशकर यांचाही सन्मान करण्यात आला.

आरोग्याबाबत सजग बनविणार

स्वास्थमचे संस्थापक सुचेता गोडबोले देशपांडे आणि राहुल देशपांडे यांनी ‘स्वास्थम’ उपयोजनाची संकल्पना उलगडून दाखविली. देशातील विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील शेकडो लोकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. पुढील दहा वर्षांत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आरोग्याबाबत सजग बनवणे, हा आमचा दीर्घकालीन उद्देश आहे, असे त्यांनी नमूद केले.