पुणे : लष्करातून कंपनी हवालदार मेजर या पदावरून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ज्ञानेश्वर नवनाथ मस्के यांच्या करिअरचे नवे पर्व सुरू झाले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवून त्यांची ‘कर सहायक’ पदासाठी निवड झाली आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवून जिल्हाधिकारी होण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
पुण्यातील मांजरी येथील ज्ञानेश्वर म्हस्के बारावीनंतर लष्करात भरती झाले. लष्कराच्या सिग्नल्स विभागात त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. लष्करातील सेवाकाळात त्यांनी श्रीनगर, राजौरी, मथुरा, जैसलमेर, लेह, लडाख अशा विविध ठिकाणी काम केले. वेगवेगळ्या कारवायांमध्ये योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली. वीस वर्षे काम केल्यानंतर आणखी सेवाकाळ बाकी असताना, पदोन्नतीची संधी असताना त्यांनी कौटुंबिक कारणास्तव २०२४मध्ये सेवानिवृत्ती घेतली. लष्करातून निवृत्त होणारे उच्चपदस्थ अधिकारी, जवान हे शासकीय, खासगी क्षेत्रात काम करतात. त्याच धर्तीवर ज्ञानेश्वर म्हस्के यांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअरचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.
एमपीएससीतील यशाबाबत म्हस्के म्हणाले, लष्करातून निवृत्त झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी आल्या होत्या. मात्र, लोकांसाठी काम करण्याची इच्छा असल्याने शासकीय सेवेतील नोकरी मिळवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कर सहायक आणि लिपिक या पदांच्या परीक्षा दिल्या होत्या. दोन्ही परीक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. मात्र, आता कर सहायक पदासाठी शिफारस झाली असल्याने ते पद स्वीकारणार आहे. कर सहायक परीक्षेत ४७२ वा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खासगी शिकवणी लावली होती. त्यामुळे सातत्यपूर्ण पद्धतीने दीड वर्षे अभ्यास केला होता. पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याने अतिशय आनंदाची भावना आहे.
म्हस्के यांनी घोले विद्यालयातून चौथीपर्यंतचे, तर हडपसरच्या साधना विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. लष्करात भरती झाल्यानंतरही शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यालयातून कला शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यानंतर मनुष्यबळ व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवीही (एमबीए) मिळवली आहे.
आता उद्दिष्ट जिल्हाधिकारी होण्याचे…
‘आता एमपीएससीच्या माध्यमातून कर सहायक पदासाठी निवड झाली असली, तरी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठीही तयारी करत आहे,’ असेही म्हस्के यांनी सांगितले.
