पुणे : ‘लोकशाही व्यवस्थेत नोकरशाहीची निवड परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. मात्र, देशातील परीक्षांच्या गुणवत्तेबाबत आणि परीक्षा प्रक्रियेबाबतच आता प्रश्न उपस्थित होत आहेत. नोकरशाहीसमोरची आव्हाने आपण कृत्रिमरीत्याच निर्माण केली आहे. लोकप्रतिनिधींच्या गुणवत्तेत झालेली घसरण, हे त्यामागील कारण आहे,’ अशी टीका माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.
मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवात डॉ. मुळे बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ता मेहेत्रे या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव हनुमंत आरगुंडे, ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. डॉ. मिलिंद आवाड, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. एकनाथ शेळके, एस. पी. जी. प्रोसेस इक्विपमेंट (इंडिया) पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद सावंत यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, मोतीराम पौळ संपादित ‘वैभवशाली मराठवाडा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुळे म्हणाले, ‘देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. मात्र, स्वातंत्र्याची खरी फलनिष्पत्ती स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यात आहे. मात्र, हे तत्त्व प्रत्यक्षात दिसत नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उभारलेली यंत्रणा अतिशय अकार्यक्षम आहे. लोकशाहीत मोठ्या क्रांतीऐवजी समाजाच्या विविध स्तरांवर सुरू असलेल्या छोट्या-छोट्या परिवर्तनाच्या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत.’
‘पुणे-मुंबईत विकास दिसत असला, तरी गावाकडे आरोग्य आणि शेतीच्या समस्या अजूनही कायम आहेत. त्यामुळे प्रशासन आणि प्रत्यक्ष ग्रामीण वास्तवातील दरी कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने काम करणाऱ्या व्यक्तींची गरज आहे,’ असे मोराळे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘दुष्काळामुळे मराठवाड्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,’ असे गांधी यांनी नमूद केले. तर ‘पाऊसच पडत नाही. पीकं वाळून गेली आहेत. सोयाबीनचे उत्पन्न अर्धेही होणार नाही. शेतकरी हवालदील झाला आहे. पण, फुगवलेल्या आकड्यांमुळे पीक विमा मिळेल का, नाही हेही सांगता येणार नाही,’ अशी खंत शहाजिंदे यांनी व्यक्त केली.
‘सेवा सुधारण्यावर भर’
‘सगळ्या शासकीय सेवांच्या ‘गव्हर्नन्स प्रोसेस इंजिनिअरिंग’चे काम हाती घेतले आहे. सरकारी सेवा आणखी सुलभ कशा होतील, कमीत कमी कागदपत्रांमध्ये काम, अशा पद्धतीची यंत्रणा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. सरकारी सेवा अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होतील, यावर भर देण्यात येत आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव हनुमंत आरगुंडे यांनी दिली.
‘पुणे रिंगरोडचे काम सर्वांत कठीण होते. अर्धा गुंठा, एक गुंठा आणि दोन-दोन गुंठ्यांपासून जमिनींचे भूसंपादन करावे लागले. अनेक प्रकारचा विरोध आणि दबाव होता. मात्र, त्याला बळी न पडता दीड वर्षात पुणे रिंग रोडचे ९५ टक्के भूसंपादन पूर्ण केले. या प्रकल्पामुळे पुणे शहराच्या वाहतुकीचे किमान ४० टक्के प्रश्न दूर होतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
