पाळीव मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एका महिलेसह चौघांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली.या प्रकरणी एका महिलेसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत डाॅ. रामनाथ ढगे (वय ५१, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. ढगे यांचे हडपसर येथील भाजी मंडई परिसरात डॉग ॲण्ड कॅट क्लिनिक आहे.
हेही वाचा >>>पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ‘आप’कडून निदर्शेने; पोस्टाने शालेय साहित्य पाठवत नोंदवला निषेध
आरोपी महिला तिच्या पाळीव मांजराला घेऊन उपचारासाठी डाॅ. ढगे यांच्या रुग्णालयात आली होती. उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू झाल्याने महिला आणि तिच्या बरोबर असलेल्या चौघांनी डाॅ. ढगे यांना मारहाण केली. मारहाणीत डाॅ. ढगे यांचा पाय फ्रॅक्चर झाला. रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी मारहाणीची घटना टिपली असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.