लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असलेल्या अधिवृक्क ग्रंथींमधील २३ सेंटीमीटर लांबीची गाठ दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आतापर्यंत भारतात दुर्बिणीद्वारे काढण्यात आलेली सर्वात लांब गाठ २२ सेंटीमीटर, तर इतरत्र २२ सेंटीमीटर एवढी लांब गाठ काढण्यात आली आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेची नोंद वैद्यकीय नियतकालिकांमध्ये होण्याची शक्यता आहे.
एस रुग्णालयातील मूत्रविकार तज्ज्ञांच्या गटाने प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. अधिवृक्क ग्रंथीचा (एड्रिनल) शरीराच्या कार्यक्षमतेत महत्त्वाचा वाटा असतो. ऍड्रिनॅलिन आणि स्टेरॉईड ही जीवनावश्यक संप्रेरके स्त्रवण्यासाठी ही ग्रंथी महत्त्वाची आहे. तिच्या कार्यक्षमतेत अडथळा आल्यास अनेक आजार निर्माण होतात. पाण्याच्या बुडबुड्यासारखी गाठ हा या ग्रंथीतील एक दुर्मिळ आजार आहे.
आणखी वाचा- पुणे: राज्यभर उन्हाच्या झळा; सोमवारनंतर पुन्हा पावसाच्या सरी
एक ५८ वर्षीय महिला पाठ दुखणे, उलट्या होणे या तक्रारींनी ग्रासलेली असल्यामुळे करण्यात आलेल्या तपासण्यांमधून तिच्या अधिवृक्क ग्रंथीत १५ सेंटीमीटर लांब गाठ असल्याचे निदान झाले. स्थानिक डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, मात्र तिने दुर्लक्ष केले. पुढे त्रास कमी न झाल्यामुळे ती ‘एस’ रुग्णालयात दाखल झाली असता ही गाठ २३ सेंटीमीटर पर्यंत वाढल्याचे दिसून आले.
आणखी वाचा- हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार, कालीचरण महाराज यांच्याकडून हिंसेचं उघड समर्थन
गाठीने रुग्णाच्या पोटातील निम्म्याहून जास्त भाग व्यापला होता. डावे मूत्रपिंड, प्लीहा, स्वादुपिंड आणि मोठे आतडे यांना चिकटलेली गाठ काढण्यासाठी पोट फाडून शस्त्रक्रिया करणे अधिक सुरक्षित होते, मात्र तशा शस्त्रक्रियेसाठी रुग्ण तयार नसल्याने थ्रीडी-लॅप्रोस्कोपी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया साडेचार तास चालली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना अधिवृक्क ग्रंथींना कोणतीही इजा पोहोचलेली नाही. या गाठीतून सुमारे तीन लिटर स्त्रावही काढण्यात आला. प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या संघामध्ये डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. मयूर नारखेडे आणि डॉ. काशिनाथ ठाकरे यांचा समावेश होता.