लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहर पोलीस दलातील शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू असून, त्यासाठी १५ हजार ४२ अर्ज आले आहेत. त्यामध्ये ६८४४ पदवीधर, तर पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले ८०३ उमेदवार आहेत. पदवी मिळवूनही बेरोजगार असलेले हे तरुण आता पोलीस शिपाई होण्यासाठी मैदानात उतरले असून, त्यात डॉक्टर, अभियंता, वकील, शिक्षक यांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या २६२ जागांची भरती केली जात आहे. १९ जूनपासून भोसरीतील इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील मैदानावर प्रत्यक्ष भरतीप्रक्रिया सुरू आहे. ५० गुणांची शारीरिक चाचणी आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि १६०० मीटर धावणे आदी प्रकारांचा समावेश आहे. बुधवारी ५०० तर गुरुवारी १ हजार जणांना शारिरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले. मैदानी चाचणीसाठी आलेले बहुतांश तरुण उच्चशिक्षित असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-शारीरिक संबंधावरून होता वाद, पतीने केले पत्नीचे अपहरण, पिंपरीतील घटना

अर्जांवरून माहिती घेतली असता एक बीएएमएस डॉक्टर, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग झालेले २७४, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग २, बी-टेक ५६, एमटेक ३, एलएलबी ९, बीएड पदवीधारक ६, बीपीएड ८, एमएड २, एमपीएड ३ यांचा समावेश आहे. यासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील उच्चशिक्षित तरुणदेखील शिपाईपदासाठी नशीब आजमावत असल्याचे समोर आले आहे.

अर्ज केलेल्या उच्चशिक्षित उमेदवारांवरून वाढत्या बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. त्याचबरोबर भारतीय सशस्त्र सेनेतील १०१ जवानांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यांनाही पोलीस बनण्यासाठी सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी भरतीसाठी तरुण गर्दी करीत आहेत.

आणखी वाचा-तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा किती नोंदणी… कधीपर्यंत करता येणार अर्ज?

अशी होते शारीरिक चाचणी

मुख्य प्रवेशद्वारावर बारकोड स्कॅनरने हजेरी घेतली जाते. या हजेरीपत्रकावर छायाचित्र व स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर उंची व छाती मोजमाप होते. कागदपत्र तपासासाठी सभागृहात पाठविण्यात येते. तिथेही पात्र झालेल्या उमेदवारांची यादी तयार करून आरएफआयडी टॅग व चेस्ट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर मुख्य मैदानात १०० मीटर धावणे, गोळाफेक, १६०० मीटर धावणे चाचणी घेतली जाते. वरीलपैकी एकाही चाचणीत अपात्र झाल्यास त्यास अपात्र टेबलकडे पाठविण्यात येते. अपात्र झालेला उमेदवार प्रथम आणि द्वितीय अपील करू शकतो.

पोलिसांनाही विविध रंगांच्या ओळखपत्राचे वाटप

पोलीस भरतीमध्ये कर्मचारी यांनी हस्तक्षेप करू नये म्हणून सफेद, नारंगी, पिवळ्या व इतर रंगांच्या पासचे वाटप केले आहे. मैदानातील पोलीस बाहेर येऊ शकत नाहीत. तसेच बाहेरील इतर ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी यांना जागा सोडून जाता येणार नाही, अशी सक्त सूचना अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.

आणखी वाचा-बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रम प्रवेशांसाठी मोठा निर्णय… आता काय होणार?

डॉक्टर – १
इंजिनिअर – ३३५
वकील – ९
शिक्षक – १९
एमबीए – ९३
बीबीए – ५७
हॉटेल व्यवस्थापन – १४
औषधनिर्माण शास्त्र – ३१
पदवीधर – ६८४४
पदव्युत्तर पदवी – ८०३