नागरिकांनी करोनाचे नियम पाळून तिसरी लाट येऊ देऊ नये हेच ‘डॉक्टर डे’चे सेलिब्रेशन ठरेल अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील एचओडी डॉ.अनिकेत लाठी यांनी व्यक्त केली आहे. तर, जिथं सायन्स हताश होतं तिथं आम्ही काहीच करू शकत नाहीत. आपल्याला करोनाला स्वीकारून पुढे जायचं आहे असं डॉ. संदीप पाटील यांनी म्हटलं आहे. ‘डॉक्टर डे’च्या निमित्ताने ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते.

आज ‘डॉक्टर डे’ असून गेल्या दीड वर्षांपासून जगातील सर्वच डॉक्टर जीव ओतून आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यात, अनेक डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. ‘डॉक्टर डे’च्या निमित्ताने यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिकांकडे तिसरी लाट येऊ देऊ नये, सर्वांनी करोनाचे नियम पाळावेत अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

डॉ. अनिकेत लाठी यावेळी म्हणाले की, “डॉक्टर डेनिमित्त आनंद आहे की दुसरी लाट ओसरत आहे. नागरिकांनी तिसरी लाट येऊ देऊ नये हेच ‘डॉक्टर डे’चं सेलिब्रेशन ठरेल. दुसऱ्या लाटेची चाहूल होती. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असे कोणाला वाटले नव्हते. हे सर्व आव्हानात्मक होतं”.
डॉक्टर, प्रशासन यांनी चांगले प्रयत्न केले यामुळेच लाट ओसरत आहे. या महामारीत अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. लाट कधी येते हे कळत नाही. पण, पुढील किमान वर्ष ते दीड वर्ष काळजी घेणं गरजेचं आहे. अस त्यांनी स्पष्ट केलं.

त, डॉ.संदीप पाटील म्हणाले की, “करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्र होती. तरुण बाधित होण्याचं अधिक प्रमाण होतं. गेल्या दीड वर्षांपासून कोविड पाहत आहोत. वाईट आणि चांगले प्रसंग आम्ही पाहिले. अनेकांवर उपचार करून त्यांना ठीक केले. जिथे विज्ञान हताश होतं तिथं आम्ही काहीच करू शकत नाही. आपल्याला करोनाला स्वीकारून पुढे जायचं आहे”.

पुढे ते म्हणाले की, “तिसरी लाट येऊ नये यासाठी नागरिकांनी सर्व नियम पाळायला हवेत. काळजी घेतली पाहिजे. दीड वर्ष झालं आवाहन पेलत आहोत, अजूनही सुरू आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, तिसरी लाट नागरिकांच्या हाती आहे तरी सर्वानी नियम पाळा”.