scorecardresearch

पुणे: उंचावरून पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

पुणे: उंचावरून पडलेल्या चार वर्षांच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश
(संग्रहित छायचित्र)

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा मुलगा २५ दिवस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वासोच्छ्वासावर उपचार घेत होता. आता तो संपूर्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.नगर रस्त्यावरील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉ. प्रदीप सूर्यवंशी आणि डॉ. सागर लाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याच्यावर उपचार केले. शाळेतून परतणाऱ्या मोठ्या मुलाला आणायला आई गेली असता हा मुलगा घराच्या बाल्कनीतून खाली डोकावत होता. त्यातच तोल जाऊन पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जवळच्या रुग्णालयातील डॉ. विजयकुमार गुट्टे आणि डॉ. राहुल केंद्रे यांनी त्याला सह्याद्रीमध्ये दाखल केले. सह्याद्री रुग्णालयाच्या नवजात शिशू आणि बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी म्हणाले की, रुग्णालयात आणले तेव्हा मुलाची परिस्थिती गंभीर होती. त्याच्या काही बरगड्या मोडल्या होत्या. हातपाय, जबड्याला गंभीर दुखापत झाली होती.

हेही वाचा >>>पुणे: मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शेवटची संधी

फुफ्फुसातील भागात रक्तस्राव आणि मेंदूतील रक्ताची गुठळी चिंताजनक होती. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अपस्माराचे झटकेही येत होते. डॉ. सागर लाड म्हणाले, सर्वात आधी त्याचा रक्तस्त्राव थांबवणे आवश्यक होते. त्यासाठी फुफ्फुसाच्या आजूबाजूला साठलेले द्रव आणि हवा बाहेर काढली. त्यामुळे फुफ्फुस आणि हृदयावरील दाब कमी झाला. उंचावरून पडल्यामुळे मेंदूच्या आतील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाला होता. सूज आणि रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी औषधे सुरू केली. तब्बल एका आठवड्यानंतर त्याने उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्याचा कृत्रिम श्वासोच्छ्वास काढला. दरम्यान हातापायांना नेहमीचे प्लास्टर आणि चेहरा आणि जबड्याच्या दुखापतींवर उपचार करण्यात आले. २५ दिवसांनी रुग्णालयातून घरी परतताना त्याचे प्लास्टर इ. कायम होते, मात्र गुंतागुंती पूर्ण बऱ्या झाल्या होत्या.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 10:55 IST

संबंधित बातम्या