पुणे : ‘वैद्यकीय क्षेत्रात अभिनवता आणि संशोधनाचा वेग अधिक आहे. जनुकीय विज्ञानासह इतर शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. आजच्यापेक्षा भविष्यातील वैद्यकीय क्षेत्र खूप वेगळे असेल. त्यामुळे भविष्यातील आरोग्य क्षेत्रासाठी डॉक्टरांना कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) मदतीने सज्ज करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. या माध्यमातून १० हजार डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात एआय वापराचे धडे देण्यात आले असून या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी शुक्रवारी दिली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एकविसाव्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. शेठ बोलत होते. ‘आधीच्या तुलनेत सध्या वैद्यकीय उपशाखा आणि सुपर स्पेशालिटी शाखा वेगाने तयार होत आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा वेगही अधिक आहे. त्यामुळे भविष्यातील वैद्यकीय क्षेत्र वेगळे असणार आहे. ते अधिक अचूक आणि रुग्णकेंद्रित असेल. त्यामुळे डॉक्टरांना आगामी काळासाठी सज्ज करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यात त्यांना वैद्यकीय क्षेत्रात ‘एआय’ वापराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात ‘एआय’चे वारे येत आहे. त्यामुळे ‘एआय’सारख्या प्रभावी साधनांच्या वापरापासून डॉक्टरांना दूर ठेवणे आपल्याला परडवणारे नाही,’ असे डॉ. शेठ म्हणाले.
‘आयोगाकडून डॉक्टरांना एआय प्रशिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एआय वापराबाबत सहा महिन्यांत २० व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यापैकी सात व्याख्याने झाली असून, त्यांना १० हजार डॉक्टरांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. या प्रशिक्षणाचा जागतिक विक्रमही झाला. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून एआय वापराबाबत येत्या वर्षभरात मानके जाहीर करण्यात येतील. ‘एआय’चा वापर करताना अधिकाधिक विदा संकलित करण्यावर भर द्यायला हवा. अन्यथा, ‘एआय’चा वापर करूनही अपेक्षित परिणाम साध्य करता येणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
तरीही जबाबदारी डॉक्टरचीच
‘एआय’ची माहिती असलेला डॉक्टर हा त्यातील माहिती नसलेल्या डॉक्टरपेक्षा नक्कीच चांगला ठरणार आहे. ‘एआय’चा प्रभावीपणे वापर करून तो अधिक चांगल्या पद्धतीने वैद्यकीय उपचार करू शकेल. परंतु, हे करताना डॉक्टरांनी डोळे झाकून ‘एआय’वर विश्वास ठेवू नये. ‘एआय’चा वापर करताना काही घडल्यास पहिली जबाबदारी ही डॉक्टरचीच असेल, हे विसरता कामा नये, असे डॉ. शेठ यांनी नमूद केले.
