कुत्र्याला वाचवण्यासाठी घरमालकाचे धाडस ; जुन्नरच्या काळवाडी गावात पहाटेचे थरारनाट्य
घराची राखण करत असलेल्या कुत्र्याने अंगणात आलेल्या बिबट्याशी प्रतिकार सुरू केला. झटापटीत तो दमला. बिबट्याने कुत्र्याला जबड्यात पकडले. कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी घरमालकाने धाव घेतली. मात्र, बिबट्याने कुत्र्यासह धूम ठोकली. तरीही घरमालक अंधारात बिबट्याचा पाठलाग करत राहिले…

बिबट्यांची दहशत असलेल्या जुन्नर तालुक्यातील काळवाडी गावात सोमवारी (१७ मे) पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान हे थरारनाट्य घडले. आजूबाजूला शेती असलेल्या ठिकाणी मदन काकडे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या पत्नी शुभांगी काकडे गावच्या पोलीस पाटील आहेत. त्यांच्याकडे सहा वर्षांपासून पाळलेला राजा नावाचा कुत्रा आहे. तो घराची राखण करत होता. पहाटे अचानक उसातून दबक्या पावलाने बिबट्याने घराच्या अंगणात प्रवेश केला. कुत्र्याची व बिबट्याची नजरानजर होताच त्यांच्यात झटापट सुरू झाली. बिबट्याने कुत्र्याची मान जबड्यात पकडून धरली. ओरडण्याचा आवाज ऐकून मदन काकडे धावत घराबाहेर आले. कशाचीही पर्वा न करता त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने कुत्र्याला घेऊन ऊसात पळ काढला. काकडे त्याच्यामागे धावत गेले. मात्र, बिबट्याने चपळाई दाखवत धूम ठोकली. त्यामुळे त्यांच्या लाडक्या राजाचा जीव ते वाचवू शकले नाही. हे थरारनाट्य घरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
या कुत्र्यावर बिबट्याने केलेला तिसरा हल्ला होता. खबरदारी म्हणून काकडे परिवाराने कुत्र्याच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा लावला होता. मात्र, तरीही बिबट्याने शिकार केलीच. काकडे यांच्याकडे आधी असलेल्या कुत्र्याचाही अशाचप्रकारे बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यू झाला होता.