लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पोलीस आयुक्तालयात वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या श्वान पथकाला अधिकची कुमक मिळणार आहे. अमली पदार्थ, गुन्हे शोधा करिता नऊ पदे भरण्यास राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली. याबाबतचे आदेश उपसचिव राजेंद्र भालवणे यांनी प्रसृत केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस) स्थापन करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. त्यासाठी पोलीस आयुक्तांकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी पुणे शहर पोलीस दलातील दोन श्वान पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांना देण्याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) दिले. त्यानुसार सीआयडीने सिम्बा आणि जेम्स या दोघांना पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडे पाठवले. आता अमली पदार्थ शोध पथकाकरिता दोन पोलीस हवालदार, दोन पोलीस शिपाई आणि गुन्हे शोध पथकाकरिता एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार आणि दोन पोलीस शिपाई अशी नऊ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर बाह्ययंत्रणेद्वारे सफाई कामगार हे एक पद भरले जाणार आहे. या माध्यमातून श्वान पथकाला बळ मिळणार आहे.

आणखी वाचा-“लवकरच आरोग्य हक्क कायदा”, ‘जनस्वास्थ्य’च्या प्रकाशन सोहळ्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सिम्बाचे वय आठ वर्ष आहे. त्याचे प्रशिक्षण राजस्थान येथे झाले आहे. तर, जेम्सचे वय पाच वर्ष असून त्याचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले आहे. श्वानांचा पोलीस दलात गुन्हे शोधक, अमली पदार्थ शोधक आणि बॉम्बशोधक या तीन प्रकारे वापर केला जातो. खून, दरोडा, घरफोडी, हरवलेली आणि अपहरण झालेली व्यक्ती शोधण्यासाठी श्वानांची मदत होते. कोकेन, गांजा, अफू आणि इतर अमली पदार्थ शोधण्यासाठी देखील श्वानांचा वापर होतो. गर्दीच्या ठिकाणी, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांमध्ये, जमिनीत पुरलेली स्फोटके शोधण्यासाठीही श्वान उपयोगी पडतात. सिम्बा हा गुन्हे शोधक म्हणून काम पाहत आहेत. तर जेम्स स्फोटके शोधण्याचे काम करत आहे.

Story img Loader