भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर उपाय आहेत!

नर कुत्र्यांच्या बरोबरीने मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण या गोष्टी रस्त्यावरील कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील, असे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

वाया जाणारे अन्न आणि मांसाच्या तुकडय़ांची योग्य विल्हेवाट लावणे, भटक्या कुत्र्यांना ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी खायला मिळण्याची सवय न लावणे आणि मुख्य म्हणजे नर कुत्र्यांच्या बरोबरीने मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरण या गोष्टी रस्त्यावरील कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील, असे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांची हत्या करण्याचा उपाय केरळ सरकारने शोधल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून देशभरातील प्राणिप्रेमी संघटनांकडून या निर्णयाचा निषेध नोंदवला जात आहे. या निमित्ताने कुत्र्यांच्या त्रासासंबंधी ‘लोकसत्ता’ने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. कुत्र्यांचा उपद्रव पुण्यातही कमी नाही. पालिकेतर्फे कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून त्यांना त्याच भागात परत सोडण्याची मात्रा अवलंबली जाते. पण निर्बीजीकरणाचा प्रत्यक्ष परिणाम दिसून कुत्र्यांची संख्या कमी होणे ही काही वर्षांची प्रक्रिया मानली जाते. शिवाय या निर्बीजीकरणाची व्याप्ती पुरेशी नसल्यामुळे उपद्रवाचा मूळ प्रश्न सुटण्यास त्याचा फारसा हातभार लागत नसल्याचेच चित्र आहे.
अन्नाची विल्हेवाट योग्य हवी!
ज्या भागातून कुत्र्यांच्या त्रासाच्या तक्रारी येतात अशा ९० टक्के ठिकाणी जवळपास एखादे चिकन, मटण किंवा माशांचे दुकान किंवा प्रामुख्याने मांसाहारी अन्नपदार्थ विकणारी लहान हॉटेल्स किंवा हातगाडय़ा यातले काहीतरी आढळते, असा अनुभव ‘अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया’चे अधिकारी डॉ. मनोज ओसवाल यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘वाया जाणारे अन्न व मांसाचे तुकडे यांची योग्य विल्हेवाट लावल्यास त्या भागातील कुत्र्यांचा उपद्रव कमी होऊ शकेल.’
डॉग बिहेव्हिअर कन्सल्टंट विक्रम होशिंग म्हणाले, ‘लोक भूतदयेपोटी भटक्या कुत्र्यांना खायला घालत असल्यामुळे त्यांचे माणसावरील अवलंबित्व वाढते. काही ठिकाणी प्राणिप्रेमी ठरावीक वेळी ठरावीक ठिकाणी जाऊन कुत्र्यांना खायला देतात. अशा ठिकाणी त्या ठरावीक वेळी कुत्री थांबून राहतात. त्या भागाच्या आसपास कुणी फिरकले तर त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता असते. भटकी कुत्री भुकेली राहत नसून ती कुठेतरी खाणे शोधतातच. त्यामुळे त्यांना अधूनमधून खायला देणे वेगळे, पण खाण्यासाठी त्यांना पूर्णत: परावलंबी न केलेले चांगले.’
कचराकुंडीत टाकल्या जाणाऱ्या खरकटय़ा अन्नासाठी त्या ठिकाणी भटकी कुत्री गोळा होत असल्याचा  प्रश्न ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानचे सचिव डॉ. वि. वै. देशपांडे यांनी मांडला.
मादी कुत्र्यांचे निर्बीजीकरणही महत्त्वाचे
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे सध्या होत असलेले काम अपुरे असून नर कुत्र्यांबरोबर मादी कुत्र्यांचेही निर्बीजीकरण आवश्यक असल्याचे मत होशिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘एका भागातील काही नर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले तरी इतर नर कुत्र्यांकडून प्रजोत्पादन होते. त्यामुळे मादी कुत्र्यांचेही निर्बीजीकरण गरजेचे आहे.’ याबाबत डॉ. ओसवाल म्हणाले, ‘मादी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नर कुत्र्यांच्या निर्बीजीकरणापेक्षा जवळपास दुप्पट खर्च येतो, परंतु दोन्ही प्रकारच्या कुत्र्यांचे एकत्रितपणे निर्बीजीकरण केले गेले तर त्याचा फायदा होऊ शकतो.’
सहा महिन्यांत ५,७२६ नागरिकांना कुत्र्यांचा चावा!
पालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्यात सहा महिन्यांत तब्बल ५,७२६ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्यामुळे त्रास सहन करावा लागला आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत ५,४५४ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘काही नागरिक पुण्याबाहेरूनही रेबिजची लस घेण्यासाठी आलेले असतात. पालिकेच्या प्रत्येक दवाखान्यातील परिचारिकांना आम्ही प्रशिक्षण दिले असून फ्रिज आणि अँटि रेबिज लशीचा साठा पुरवण्यात आला आहे. पालिकेचे ३८ बाह्य़रुग्ण विभाग व १६ प्रसूतिगृहांमध्ये ही लस मोफत उपलब्ध आहे.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dog sterilization rabies

ताज्या बातम्या