पुणे – दहीहंडी फोडताना उंचावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेला तरुण मेंदूमृत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार गरजू रुग्णांना निरोगी अवयव प्राप्त झाले.

हेही वाचा : पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला; भवानी पेठेतील घटना; आठ जण अटकेत

सदर मेंदूमृत अवयवदाता हा चिखली येथील २८ वर्षांचा तरुण रहिवासी होता.  अर्थार्जनासाठी तो रीक्षा चालवत असे. दहीहंडी उत्सवात सहभाग घेतल्यानंतर उंचावरुन पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचारांसाठी त्याला डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याला मेंदूमृत जाहीर करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याची परवानगी दिली. त्यानंतर तरुणाचे हृदय सुरत येथिल बी. डी. मेहता महावीर हार्ट इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले. फुप्फुसे हैदराबाद येथील गरजू रुग्णासाठी पाठवण्यात आली. एका मूत्रपिंडाचे ससून रुग्णालयातील गरजू रुग्णावर तर दुसऱ्या मूत्रपिंडाचे डी. वाय. पाटील रुग्णालयातील गरजू रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे याबाबत माहिती देण्यात आली.