बारामती: ‘माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरण्याची गरज नाही. कोणाला अजित पवार यांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात जाऊन निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. अजित पवार यांच्या नावाचा वापर करायचा आणि त्यांच्याच कुटुंबाला बदनाम करायचे, हे योग्य नाही आणि हे चालणार नाही.’ असे आव्हान राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कारखान्याच्या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘ही निवडणूक कोणत्या एका व्यक्तीचा पराभव करण्यासाठी किंवा गटबाजीसाठी नाही, तर शेतकरी हितासाठी आहे. पक्षाच्या पद्धतीप्रमाणे मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निरीक्षक नेमण्यात आले. सर्वांच्या भावना आणि मतांचा विचार करून संचालक मंडळासाठी सर्वसमावेशक उमेदवार निश्चित करण्यात आले आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे म्हणजेच सहकार. ‘माझे एकट्याचेच ऐका’ असे सहकारात चालत नाही. उमेदवारी मिळाली नाही, त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.’

‘माझा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवार यांचे नाव वापरण्याची गरज नाही. कोणाला अजित पवार यांच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात जाऊन निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी. अजित पवार यांच्या नावाचा वापर करायचा आणि त्यांच्याच कुटुंबाला बदनाम करायचे, हे योग्य नाही.’ असेही त्या म्हणाल्या.

‘अजित पवार यांनी विश्वासाने हा कारखाना जपला, त्याच विश्वासाने मी हा कारखाना जपणार आहे. संचालक मंडळातील २१ जणांना विश्वासात घेऊनच चेअरमनची निवड केली जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे सोमेश्वर कारखाना शेतकऱ्यांना सर्वोच्च दर देऊ शकला. कारखान्याने मिळवलेले यश हे त्यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. त्यांनी दाखविलेल्या दिशेनेच आपण पुढे जायला हवे. सोमेश्वर कारखाना कुणा एका व्यक्तीची वैयक्तिक मालमत्ता नाही. ही संस्था सभासदांच्या विश्वासातून उभी राहिली आहे. कारखान्याच्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचे नसून हजारो सभासद आणि शेतकऱ्यांचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.