समाजमाध्यमातलं भान : शालाबाह्य़ मुलांसाठी ‘डोअर स्टेप’

‘डोअर स्टेप’ची स्थापना रजनी परांजपे यांनी १९९३ साली पुण्यात केली.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची आमले

हजारो मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेविषयी..

समाजमाध्यमांमध्ये फक्त लाईक, शेअर, पोस्ट एवढय़ावरच न राहता अनेक संस्थांनी विधायक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केले आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. समाजातील  वंचित, गरजू लोकांपर्यंत पोचण्यासाठी समाजमाध्यमांनी मदत केली आहे. विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘डोअर स्टेप’नावाची संस्था गेली अनेक वर्षे काम करत आहे.

‘डोअर स्टेप’ची स्थापना रजनी परांजपे यांनी १९९३ साली पुण्यात केली. शहरातील वंचित मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शालाबाह्य़ मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्थेच्या उपक्रमांविषयी गौरी गोखले म्हणाल्या,की  मुलांना शिक्षण देण्यासाठी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात बांधकामावर जाऊन मजुरांच्या मुलांना शिकवणे, मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालये, संगणक प्रशिक्षण, अभ्याससत्रे आयोजित करणे, शाळा दूर असणाऱ्या मुलांना शाळेत नेण्याची व आणण्याची सोय करणे, प्रत्येक मूल महत्त्वाचे (एव्हरी चाइल्ड काऊंटस) यासारखे अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि खासगी मिळून १८६ शाळांमध्ये उपक्रम सुरू आहे.

बांधकामावरील मजुरांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी कामगारांचे समुपदेशन केले जाते. तसेच, मुले शाळेत न जाण्याचे मुख्य कारण म्हणजे मुलांवर असलेली भावंडांची जवाबदारी हे असते. या समस्येवर उपाय म्हणून मुलांचा सांभाळ करणाऱ्यांची सोयदेखील केली जाते. मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी ‘लहानपणी गिरवू धडे’ हा उपक्रम मुलांसाठी सुरू करण्यात आला आहे.

संस्थेचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात समाजमाध्यमांचे मोठे साहाय्य झाले आहे. संस्थेची माहिती संस्थेच्या फेसबूक पेजद्वारे तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून पोहोचवली जाते. सध्या संस्थेमध्ये अडीचशे ते तीनशे स्वयंसेवक काम करत आहेत. या विषयी सांगताना संस्थेच्या सोनल कुलकर्णी म्हणाल्या, की संस्थेचे स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, पालक असे वेगवेगळे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप असून या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जातो आणि विविध उपक्रमांची माहिती दिली जाते. यू टय़ूब चॅनेलवरूनही चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व व संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली जाते.  नवीन उपक्रमाविषयी गौरी गोखले म्हणाल्या,‘सध्या बालवाडीच्या मुलांसाठी चेतना प्रकल्प सुरू आहे. हा उपक्रम शहरातील चार सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेच्या तीस बालवडय़ांमध्ये सुरू आहे. बालवाडीतील मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एका ठोस अभ्यासक्रमाची गरज असून त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.’  संस्थेचे फेसबुक पेज व संकेतस्थळ  ‘डोअर स्टेप स्कूल’ या नावाने आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी ७०२८०१४२०२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Door step for out of school children

ताज्या बातम्या