पुणे : देशात संशोधकांना संशोधन करताना विदा उपलब्ध नसणे ही मोठी अडचण आहे. कोविड संकटाआधी अनेक मोठ्या साथी आल्या मात्र त्यावेळी रुग्णांच्या विदेची नोंद झाली नाही. कोविड काळात पुणे नॉलेज क्लस्टरने पुढाकार घेऊन दोन हजार रुग्णांची आरोग्यविषयक व उपचाराची माहिती संकलित केली. त्याचा विदासंच (डेटाबेस) आता संशोधकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुणे नॉलेज क्लस्टरने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, नोबल हॉस्पिटल आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांना सोबत घेऊन कोविड काळात रुग्णांच्या माहितीचे संकलन केले. यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसह एआयक्यूओडी आणि एपिक-हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या कंपन्यांचाही समावेश होता. एकून दोन हजार रुग्णांची आरोग्यविषयक आणि उपचाराची माहिती संकलित करण्यात आली आहे. हा विदासंच पुणे नॉलेज क्लस्टरचे संकेतस्थळ येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे नॉलेज क्लस्टरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज यांनी यामागील संकल्पना आणि विदासंच तयार करण्याचा प्रवास मांडला. हेही वाचा - पुणे : अवयवदानामुळे दोघांना जीवदान! महिनाभरात दोन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी यावेळी बोलताना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, संसर्गजन्य रोगांच्या वैद्यकीय संशोधनात या विदासंचाच्या रुपाने भारताने एक पाऊल पुढे टाकले आहे. आधीच्या मोठ्या साथींवेळी आपण हे करू शकलो नव्हतो. कोविड संकटाच्या काळात डॉक्टरांकडून लेखी स्वरूपात आपण रुग्णांची माहिती संकलित केली होती. ती नंतर डिजिटल स्वरूपात जतन करून त्याचा वापर विदासंचात करण्यात आला आहे. या विदासंचाचा आगामी काळात संशोधकांना मोठा फायदा होईल. जग हे विदेसाठी भुकेले आहे. त्यामुळे योग्य वेळी विदा जाहीर करणे गरजेचे आहे. या विदासंचाच्या आधारावर इतर आजारांसाठीही विदासंचाची निर्मिती भविष्यात केली जाईल. त्यातून संसर्गजन्य रोगाचा प्रवास आपल्याला समजू शकतो आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने त्यावर उपाय करू शकतो, असे नोबल हॉस्पिटलचे डॉ. अमित द्रविड यांनी स्पष्ट केले. हेही वाचा - कल्याणीनगर अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईने चौकशीत पोलिसांना असहकार करत अशी दिली उत्तरे… कोविड वैद्यकीय विदासंचात काय. - शंभर वैद्यकीय निकषांच्या आधारे माहिती - रुग्णांच्या उपचार अहवालातील बाबी - रुग्णांची ऑक्सिजन पातळी - प्रयोगशाळेतील तपासणीची निरीक्षणे - रुग्णांना आधीपासून असलेले आजार