भिक्षेकऱ्यांच्या हाताला काम देण्यात डॉ. अभिजित सोनवणे यांचा खारीचा वाटा

आयुष्यात घडलेल्या एका गोष्टीमुळे घरच्यांचे सुटलेले पाश.. वैद्यकीय व्यवसाय करताना आलेले अपयश.. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन संपविण्याविषयी मनात आलेला नकारात्मक विचार.. भिक्षेकरी दांपत्याने दिलेला मदतीचा हात..  स्थिरस्थावर झाल्यावर भिक्षेकरी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींवर केलेले वैद्यकीय उपचार.. केवळ उपचार करण्यापेक्षा या हातांना काम देता येईल या भूमिकेतून भिक्षेकऱ्यांचे केलेले मतपरिवर्तन.. आत्मविश्वास जागृत होत अनेक भिक्षेकऱ्यांनी धरलेली स्वावलंबनाची वाट.. भिक्षेकऱ्यांना आत्मनिर्भर करीत भिक्षेकरीमुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत डॉ. अभिजित सोनवणे खारीचा वाटा उचलत आहेत.

डॉक्टर फॉर बेगर्स अशीच अभिजित सोनवणे यांची ओळख. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या तीन वर्षांत ४० आजी-आजोबा आणि दहा युवकांच्या जीवनामध्ये  स्वावलंबनाची पहाट उगवली आहे. आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा ‘अभिजात’ मार्ग सोनवणे यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मी स्वत:च जीवन संपविण्याच्या विचारात होतो. पण, अनेकांच्या जीवनात आनंद  फुलविण्याचे काम करीत त्यांना श्रमाचे मोल जाणवून देण्यामध्ये मला समाधान लाभत आहे, असे अभिजित यांनी सांगितले.

मी मूळचा म्हसवड (ता. माण, जि. सातारा) येथील. अभ्यासात हुशार असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊन मी १९९९ मध्ये उत्तीर्ण झालो. कागदोपत्री मी डॉक्टर असलो, तरी माझ्या ज्ञानाला प्रात्यक्षिकांची जोड नव्हती. त्यामुळे खडकवासलाजवळील अगळंबे गावामध्ये प्रॅक्टिस करीत असताना अपयशाला सामोरे जावे लागले. त्यातच मी आंतरजातीय प्रेमविवाह केला. पत्नीच्या माहेरकडच्या लोकांना आमचा विवाह मान्य नव्हता. त्यांनी माझ्या घरच्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना आणखी त्रास व्हायला नको म्हणून मीच घरच्यांशी संबंध तोडले. जीवनामध्ये आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला. पण, त्या काळात अगळंबे गावातील भिक्षेकरी दांपत्याने मला आधार दिला. त्यांनी भीक मागून आणलेल्या अन्नातील  पदार्थ तर, दिलेच. पण, मला औषधांची खरेदी करण्यासाठी पैसेही दिले, अशा गप्पांच्या ओघात अभिजित यांनी जीवनकहाणी सांगितली.

‘आयपास’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचा महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून मला काम करण्याची संधी लाभली. सहा आकडी पगार होता. कुठे होतो आणि कुठे पोहोचलो हा विचार करताना मला त्या भिक्षेकऱ्यांची आठवण झाली. १५ ऑगस्ट २०१५ रोजी नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा रस्त्यावर आलो. शहरातील विविध मंदिरांबाहेर थांबून सकाळी दहा ते चार या वेळात तेथील भिक्षेकऱ्यांवर वैद्यकीय उपचार करू लागलो. त्यांच्याशी माझे नाते निर्माण झाले. त्याचा फायदा घेत मी ज्येष्ठ नागरिकांना काम करण्यासाठी प्रवृत्त केले. आजींना वाती वळण्याचे, त्या विकण्याचे, शनीला अर्पण करण्यात येणाऱ्या तेलाच्या पुडय़ा बांधून विकण्याचे काम देत कष्टाचे महत्त्व रुजविले. चर्मकार समाजातील काकांना चप्पल दुरुस्तीचे तर, दुसऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला सलूनचे साहित्य घेऊन देत स्वावलंबी होण्यासाठी मदत केली.  भीक मागण्याचे सोडून त्यांनी जमेल, झेपेल, पचेल आणि रुचेल  ते काम करावे हा माझा आग्रहच नाही तर अट्टहास असतो. शनिवारवाडय़ाजवळील नवग्रह मंदिर येथे भीक मागणाऱ्या युवकांना महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. दोन जण रुजू झाले असून उर्वरित युवक काही दिवसांत काम सुरू करतील. भिक्षामुक्त समाजनिर्मिती व्हावी यासाठी मी माझ्या परीने शक्य ते प्रयत्न करीत आहे, असे अभिजित सोनवणे यांनी सांगितले.