पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अजय तावरे यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या बाबतचे आदेश दिले.
कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत संगणक अभियंता तरुण आणि त्याच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुने बदलण्याच्या प्रकरणात ससूनमधील डाॅ. श्रीहरी हाळनोर आणि डाॅ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली होती.
डाॅ. तावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. ‘या प्रकरणातील काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. डाॅ. तावरे हे गेले २१ महिने कारागृहात आहे. समता तत्त्वावर डाॅ. तावरे यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा’, असा युक्तिवाद तावरे यांच्या वकिलांनी केला.
डाॅ. तावरे यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयने अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. डाॅ. तावरे यांनी सहकार्य करावे. साक्षीदारांवर दबाब आणू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात डाॅ. तावरे यांच्यासह अमर गायकवाड, अश्फाक मकानदार, शिवानी अगरवाल, आशिष मित्तल, अल्पवयीन मुलांना जामीन मंजूर केले आहेत. या प्रकरणात अद्याप अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, डाॅ.श्रीहरी हाळनोर, ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे यांना जामीन मंजूर करण्यात आला नाही.
