पुणे : ‘किडनी प्रत्यारोपण प्रकरणात प्रत्यारोपण करण्यास मंजुरी देणाऱ्या समितीची बैठक झाली होती. समितीने प्रत्यारोपणाला मंजुरी दिल्यानंतर त्याबाबतचा अहवाल ससून रुग्णालयातून तीन दिवसांनंतर खासगी रुग्णालयात पाठविण्यात आला. किडनी प्रत्यारोपण समन्वयकांनी तीन दिवस उशिराने संबंधित अहवाल खासगी रुग्णालयाकडे पाठविला होता. याच कालावधीत आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपी डाॅ. अजय तावरे आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली.

किडनी प्रत्यारोपण प्रकरणात न्यायालयाने डाॅ. तावरेला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. खासगी रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहआरोपी असलेला ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेच्या अध्यक्षतेखाली ससूनच्या ‘विभागीय मानवी अवयव प्राधिकार समिती’ने दहा किडनी प्रत्यारोपणांना परवानगी दिली होती. डॉ. तावरे हा तपासात सहकार्य करत नसून, तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. डॉ. तावरेच्या कार्यकाळात झालेल्या दहा किडनी प्रत्यारोपण प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येत आहे. किडनी प्रत्यारोपण प्रकरणाची बैठक आठ मार्च २०२२ रोजी झाली होती. समितीतील सर्व सदस्यांनी त्याच दिवशी किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी देऊन अहवालावर स्वाक्षरी केली होती.

अहवाल ११ मार्च २०२२ रोजी ससून रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची नोंद आहे. हा अहवाल तीन दिवस उशिरा पाठविण्यात आला. ससून रुग्णालयाचे किडनी प्रत्यारोपण समन्वयक बनसोडे आणि सुरवसे यांनी अहवाल उशिरा पाठविला, असे डाॅ. तावरेने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून, डाॅ. तावरेच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन आडागळे यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचाव पक्षाकडून ॲड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अमोल शिंदे यांनी डॉ. तावरेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.