भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अकरा फुटी शिल्प प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे सोमवारी (१३ एप्रिल) साकारणार आहेत. ज्या महामानवाने कोटी कुळे उद्धरली त्या राष्ट्रपुरुषाचे अर्धपुतळाकृती भव्य शिल्प साकारण्याचा हा दुर्मिळ प्रसंग पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे औचित्य साधून अजिंक्य भीमज्योत सेवा संघाने हा योग जुळवून आणला आहे. दांडेकर पूल चौक येथे सकाळी अकरा वाजता बाबासाहेबांचे शिल्प साकारण्यास प्रारंभ होणार असून अवघ्या काही तासांमध्ये म्हणजेच सायंकाळपूर्वी हे शिल्प पूर्ण होणार आहे. मंगळवारी आंबेडकर जयंतीच्या दिवशी (१४ एप्रिल) हे शिल्प नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल. त्यानंतर हे शिल्प प्रमोद कांबळे यांच्या नगर येथील स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. हे शिल्प साकारले जात असताना ते पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अिजक्य भीमज्योत सेवा संघाचे अध्यक्ष तानाजी ताकपेरे आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केले आहे.
प्रमोद कांबळे म्हणाले, बाबासाहेबांच्या शिल्पासाठी प्रत्येकी ५० किलो शाडूमातीची गोणी याप्रमाणे ७५ गोणी लागणार आहेत. साधारणपणे सात ते आठ तासांमध्ये हे शिल्प साकारण्याचा प्रयत्न असेल. माती कालवून त्याचे गोळे करून देण्यासाठी १५ कलाकार माझ्यासमवेत काम करणार आहेत. ‘वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्ड’ संस्थेचे अधिकारी हे शिल्प साकारताना उपस्थित राहणार असून ते या उपक्रमाची विक्रम म्हणून नोंद करण्यासाठी उत्सुक आहेत.